हा जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी कधीच संपत नाहीत. अशा गंभीर परिस्थितीत गेल्या वर्षी पिकवलेल्या द्राक्षांचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी आता चिंतेत आहेत. ते नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. त्या संदर्भात सादर आहे हा अन्नदात्याच्या दुर्दशेचा वृत्तांत…

उत्तर कर्नाटकातील एक ऐतिहासिक जिल्हा, बसवण्णा यांची भूमी या नावाने प्रसिद्ध असलेल्या विजापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखले जाते. येथील शेतकरी कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने हैराण होतो. यामुळे दरवर्षी विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबात भोग चुकत नाहीत. तशातच जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2020-21 मध्ये द्राक्ष आणि तूर पिकाचा विमा काढला आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी पिकवलेली द्राक्षे अतिवृष्टी व करपा रोगामुळे खराब झाली. तरीही त्यांना पिकविम्याची भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी द्राक्ष पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. असे असताना द्राक्षांचा विमा भरूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी 2020-21 साठी शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाचा विमा उतरवला आहे. मात्र झालेल्या नुकसानीची विमा भरपाई त्यांना मिळालीच नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तलाठी आणि पीडीओनी योग्य पद्धतीने सर्वेक्षण केले नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेजारील बेळगाव, बागलकोट या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या द्राक्षांचे नुकसान झाल्यावर त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मात्र केवळ दुष्काळग्रस्त विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळालेला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई न दिल्यास संघर्षाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.
एवढेच नाही तर विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनाही पत्र लिहून नुकसान भरपाईसाठी साकडे घातले आहे. किमान आता तरी सरकार जागे होऊन शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करते का याची प्रतीक्षा करावी लागेल.


Recent Comments