मुसळधार पावसाने बेळगावात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही वसाहती पाण्याखाली गेल्या असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे हाल होत आहेत. या सर्व समस्या तीव्र होऊनही लोकप्रतिनिधी व अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

होय, जिकडे पाहावे तिकडे पाणी..पाणी.. आणि केवळ पाणी..! मुसळधार पावसाने बेळगावातील जनता अक्षरश: हैराण झाली आहे. वरुणराजा पुरे कर तुझा कहर असेच लोक म्हणत आहेत. होय, तुम्ही पाहत असलेले हे दृश्य आहे बेळगावच्या ओमनगरमध्ये पावसाने आणलेल्या आपत्तीचे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओमनगरमधील रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहत आहे. रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. लेंडी नालाही भरला असून पाणी रस्त्यावर वाहत घरांमध्ये शिरले आहे. इथला रस्ता कोणता? माहित नाही अन नाला कोणता माहित नाही अशी स्थिती आहे. सगळीकडे नुसते पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना घराबाहेर पडताही येत नाही. पावसामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असतानाही महापालिकेचे अधिकारी व स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या संदर्भात येथील एका महिलेने आमच्या ‘इनन्यूज आपली मराठी’सोबत बोलताना सांगितले की, आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. पावसाच्या पाण्यासोबत सापही घरात शिरला होता. संबंधितांनी लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली.

काल, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाला तुडुंब भरून ओम नगरात पाणी शिरल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे लहान मुले व वृद्धांना घराबाहेर पडता येत नाही. साप-विंचूची भीती सुरू झाली आहे. तसेच संसर्गजन्य आजार होण्याची भीती आहे. आमच्या भागाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.
एकंदरीत ओम नगर पावसाच्या पाण्यात जणू तरंगत असल्यासारखं वाटतंय. येथील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. आमच्या वृत्तानंतर तरी जागे होऊन अधिकारी इथल्या समस्या सोडवतील का, हे पाहावे लागेल.


Recent Comments