राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण 2% आहे. ते 1% पर्यंत कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बेंगळुरातील रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटलच्या वतीने हॉटेल मॅरियट येथे आज आयोजित केलेल्या ‘बालवैद्यक शास्त्रातील नवे बदल’ यावर आयोजित परिषदेचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उद्घाटन केले. त्यानंतर बोलताना बोम्मई म्हणाले, मातामृत्यूचे प्रमाणही कमी झाले पाहिजे. राज्यातील 5-6 जिल्ह्यांमुळे हे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे राज्याच्या इतिहासात प्रथमच विकासाभिमुख तालुके निश्चित करून शिक्षण, आरोग्य, कुपोषण, महिला व बालकांचे आरोग्य या बाबींचा दर्जा राखून विकासासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या 5 जिल्ह्यांमध्ये चांगल्या सुविधा देऊन बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुदृढ भविष्यासाठी बालरोगतज्ज्ञांनी या कार्यात आमच्यासोबत हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्यासाठीच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. कुपोषण निर्मूलनावर विशेष भर देण्यात आला आहे. तीव्र कुपोषित बालकांना दिला जाणारा आहार सामान्य कुपोषण असलेल्या बालकांनाही दिला जातोय. अंगणवाड्यांमधील बालकांना चांगला आहार देण्याबरोबरच कामगारांच्या मुलांनाही विशेष पोषण आहार दिला जातोय. आमचे सरकार संवेदनशील आहे. गरिबी निर्मूलनासाठी पावले उचलली आहेत. शिक्षण आणि पायाभूत सुविधांसह तांत्रिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. आमचे तंत्रज्ञानावर आधारित राज्य आहे. खेड्यापाड्यातही आपले तरुण तांत्रिकदृष्ट्या कुशल असले पाहिजेत या दृष्टीने सरकार काम करत आहे. आपण सर्वजण या उपायाचा भाग होऊ या. आरोग्य क्षेत्रातील आव्हाने जिंकूया. आईच्या पोटातून पृथ्वीच्या गर्भापर्यंतच्या प्रवासात आपण आपली भूमिका चोख बजावूया, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, फलोत्पादन मंत्री मुनीरत्न, रेनबो बाल रुग्णालयाचे प्रमुख, अधिकारी आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.


Recent Comments