रायचूर शहरात दूषित पाण्यामुळे गेल्या महिन्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हि परिस्थिती अशी असूनदेखील अद्याप याची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने या प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील विस्तृत माहिती पाहुयात या पुढील रिपोर्टमधून..
: विजापूर शहरात पंधरा दिवसातून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या पद्धतीला येथील जनता वैतागली आहे. येथील जनतेला पिण्याच्या पाण्याचा साठा सोन्याप्रमाणे करावा लागत असून ‘आधीच उल्हास अन त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती असताना गटारमिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
पिण्याच्या पाईपलाईनमधून ड्रेनेज, गटारीचे पाणी आल्याने येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विजापूर शहरातील गोलघुमट परिसरातील वड्डर गल्ली, हनुमान मंदिर, बेन्डीगिरी परिसरात हा दूषित पाणी पुरवठा करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून दूषित पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पंधरा दिवसातून एकदा येणाऱ्या पिण्याच्या पाण्या ऐवजी, पाण्याची टंचाई असूनही दूषित पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाकडून पाणी उकळून पिण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र असे ड्रेनेज मिश्रित पाणी उकळून कसे प्यावे हा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.
केवळ दूषित पाणीच नाही तर या पाण्यातून अळ्या देखील आल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हि परिस्थिती अशीच असून येथील नागरिक पाणी पुरवठा मंडळाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. या पाण्यामुळे अनेक नागरिकांना ताप, सर्दी, उलट्या झाल्या असून आधीच पाण्याची टंचाई आणि त्यात दूषित पाण्याची भर यामुळे येथील नागरिक वैतागले आहेत.
पाणीपुरवठा मंडळाने नागरिकांच्या होणारी या गैरसोयींकडे तातडीने लक्ष पुरवून, त्यांच्या आरोग्याशी खेळ करणे थांबवावे, नियमित आणि सुरळीत तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.


Recent Comments