हुक्केरी तालुक्यात सराफी दुकाने आणि किराणा दुकानातून चोरी करणाऱ्या खतरनाक इराणी टोळीचा पर्दाफाश करण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे.

होय, अलीकडे हुक्केरी तालुक्यात, इराणी टोळीच्या सदस्यांनी सराफी दुकाने आणि किराणा दुकानातून चोरी करून धुमाकूळ घातला होता. याबाबत जनतेने पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार यांनी हे आव्हान स्वीकारत एक पथक तयार करून कारवाईला सुरुवात केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सखोल विश्लेषण केल्यानंतर, परराज्यातील धोकादायक टोळक्यातले हे चोरटे असल्याची पुष्टी झाली. यावरून महाराष्ट्रातील पुणे येथील इराणी टोळीचा या चोऱ्यांत हात असल्याची माहिती मिळताच त्यांचा पाठलाग करून दोघा चोरट्याना जेरबंद करण्यात यश आले. अटक केलेल्यांनी महाराष्ट्रातील चंदगड आणि गोकाक तालुक्यातील मुडलगी शहरात अशाच प्रकारे चोऱ्या केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सुमारे 9 लाख 58 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली.
या कारवाईत हुक्केरी पोलीस ठाण्याचे पी.एस.वाय.एल.एल.परतेण्णावर, एएसआय ए. एस. सनदी, हेडकॉन्स्टेबल आर. एम.यरगट्टी, मंजुनाथ कब्बूर, जी. एस. कांबळे आदींनी सहभाग घेतला. एसपी संजीव पाटील यांनी हुक्केरी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे.


Recent Comments