बेळगावच्या वडगाव परिसरात मुसळधार पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी सकल मराठा समाज सरसावला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगावच्या वडगाव परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटील गल्ली आणि आनंद नगरमध्ये 3-4 घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. लोकांना घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
हा प्रश्न सोडवण्यासाठी बेळगाव सकल मराठा समाज पुढे आला आहे. आज रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वडगावच्या पाटील गल्ली आणि आनंद नगरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबीयांच्या समस्या ऐकून घेतल्या. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडितांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.
रमाकांत कोंडुसकर यांनी स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून देऊन घरातील पाणी बाहेर काढण्यास मदत केली आहे. पावसामुळे नुकसान झालेल्यांना सकल मराठा समाज मदत करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील हालगा येथील लक्ष्मण बोम्मनवर यांच्या घराची भिंत कोसळली. पावसामुळे शिथिल झालेली हालगा येथील लक्ष्मण बोम्मनवर यांच्या घराची भिंत काल रात्री अचानक कोसळली. त्यामुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. लक्ष्मण बोम्मनवर हे कुली काम करून आपले घर चालवितात त्यामुळे त्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.


Recent Comments