पान मसाला विक्री करून सरकारी कर बुडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा चिक्कोडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कर्नाटक, तेलंगणा आणि दिल्लीतील मिळून सातजणांना अटक केली आहे. दिल्लीतील बनावट पानमसाला कारखान्यावर छापा मारून लाखो रुपयांची यंत्रसामुग्री जप्त करण्यात आल्याची केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी दिली.

बेळगावात शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, सदलगा पोलिस ठाण्यात याच महिन्यात 12 जुलै रोजी बनावट पानमसाला विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीत तयार होणाऱ्या पान मसाल्याचा दर्जा चांगला नसल्याची तक्रार पान मसाला कंपनीकडे करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीचे सेल्स मॅनेजर शीतल पाटील यांनी ग्राहकासोबत येऊन तक्रार दिली. या संदर्भात तपास केला असता काही लोक एकसंबा मार्केटमध्ये बनावट पान मसाला विकताना आढळून आले.
यावेळी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यात हे बनावट पान मसाला विक्रीचे जाळे बेळगाव जिल्हाच नव्हे तर परराज्यातही पसरल्याचे स्पष्ट झाले. चिक्कोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगार यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने हैदराबादला जाऊन केलेल्या तपासात आरोपी घरात बनावट पान मसाला तयार करत असल्याचे समजले. या संदर्भात तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाच्या तपासात आरोपी प्रसिद्ध औषध कंपन्यांच्या पॅरासिटेमलच्या गोळ्या व अन्य काही औषधांचे उत्पादन करून डुप्लिकेट पॅकेटमधून विकत असल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगून एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, तपासादरम्यान असे आढळून आले की आरोपी आरएमडी, विमल आदी कंपन्यांचे बनावट पानमसाला विकण्याबरोबरच पॅरासिटामॉलचे डुप्लिकेट पॅकेट तयार करून आरोपी बनावट औषधांची निर्मिती करून विकत होते. बनावट पान मसाला आणि या औषधाच्या बनावट उत्पादनाबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी आणखी काहींना अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments