बेळगाव जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जीव आणि वित्तहानी झाल्याच्या घटना घडत आहेत, खानापूर तालुक्यातील लिंगनमठजवळील चुंचवाड गावात गोठ्याची भिंत अंगावर कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान खानापूर तालुक्यात आहे. त्यामुळे यंदाही या तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. तालुक्यातील लिंगनमठजवळील चुंचवाड गावात गोठ्याची भिंत अंगावर कोसळून एका युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 15 वर्षीय अनंत धर्मेंद्र पाशेट्टी असे मृत युवकाचे नाव आहे.
अनंतचे कुटुंबीय मेंढपाळ आहेत. गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो घराजवळील गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांना चार घालण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक गोठ्याची भिंत त्याच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत अनंत जागीच ठार झाला. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या घरच्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ढिगारा हटवून अनंतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तालुका सरकारी इस्पितळात पाठविण्यात आला.


Recent Comments