चिकोडी तालुक्यातील नद्यांना पूर येण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी बोटीच्या माध्यमातून या परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

महाराष्ट्रातील पश्चिम भागात होत असलेल्या जोरदार पावसामुळे सीमावर्ती भागातील चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदी आणि इतर उपनद्यांमधील पाणी पातळी वाढली आहे. आज कल्लोळ बॅरेज मधून १ लाख १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला असून कृष्णा आणि इतर उपनद्यांमधील पाणी पातळी १ फुटाने वाढली आहे.
चिकोडी तालुक्यातील इंगळी, मांजरी, येडूर, चंदूर गावातील कृष्णानदीच्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी दाखल झाले होते. बोटीच्या माध्यमातून त्यांनी पाण्याच्या पातळीचे निरीक्षण केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पूरपरिस्थितीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नदीतीरावरील गावांमध्ये बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्यासहीत आमदार गणेश हुक्केरी हेदेखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत. इंगळी तसेच यडूरवाडी गावातील रस्त्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले असल्याचेही प्रकाश हुक्केरी म्हणाले.
यावेळी ग्रापं उपाध्यक्ष शशिकांत धनवडे, संजय कुडची, रमेश मुरचटे, चंद्रकांत लंगोटे, गणपती धनवडे, अनिल पाटील, अण्णासाहेब वडगोले, चंद्रकांत पाटील, संतोष कुंभार, गोपाळ मगदूम, मारुती कांबळे, शिवानंद करोशी, महेश कागवाडे, राहुल देसाई, संजू पाटील, अप्पासाहेब बेळवी, जयपाल बोरगावे, भीमगौडा पाटील, विजय जाधव, यासिन नदाफ, अक्षय अम्मनगी, पांडुरंग कोळी, पांडुरंग माने, सुभाष तोरसे, दीपक लामखाने, सुभाष नरवाडे आदींसह अनेकजण उपस्थित होते.


Recent Comments