कृष्णा नदीकाठ परिसराच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कारमधून न उतरताच मंगावती-जुगुळ ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारल्याने जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांची नाराजी ओढवून घ्यावी लागली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून नदी काठ परिसराची पाहणी करण्यासाठी गेलेले जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कागवाड तालुक्यातील मंगावती-जुगुळ या गावांना भेट दिली. या दरम्यान या परिसरातील नागरिकांच्या समस्या त्यांनी ऐकून न घेता, कारमधून न उतरता ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले.
मागील वर्षी आलेल्या महापुरात घरांचे नुकसान झाले. राज्य सरकारने प्रत्येक नुकसानग्रस्त घरासाठी १० हजार रुपयांची भरपाई देऊ केली आहे. यातील अद्याप ११०० नुकसानग्रस्त भरपाईविनाच आहेत. सदर नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी, अनेक नुकसानग्रस्तांच्या समस्या निवडण्यात आल्या नाहीत. आता पुन्हा महापुराचा सामना करावा लागत असून आपल्या समस्यांकडे लक्ष पुरविण्याची मागणी स्थानिक ग्राम पंचायत सदस्य अण्णासाहेब पाटील यांनी केली .
आपल्या गावातील, ग्रामस्थांच्या समस्या ऐकण्यासाठी जाणून घेण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारमधून न उतरताच निवेदन स्वीकारले. आपल्या समस्या आपण कोणासमोर मांडायच्या? असा संतप्त सवाल उपस्थित करत स्थानिक ग्राम पंचायत सदस्य, भाजप नेते अरुण गाणीगेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. ()
कागवाडचे तहसीलदार राजेश बुरली यांनी जिल्हाधिकाऱ्यांना येथील समस्यांसंदर्भात माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या निवारा केंद्रांना भेट दिली. उगार – कुडची दरम्यान असलेल्या पुलाचीही पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही, जिल्हा पोलीस प्रमुख, चिकोडी सह पोलीस आयुक्त तसेच तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments