उत्तम पीक पाण्यासाठी उत्तर कर्नाटकात आषाढ महिन्यात ‘गुळ्ळव्वा देवी’ची पूजा केली जाते. या ‘गुळ्ळव्वा देवी’ ला गूळकव्वा, गोलकव्वा या नावाने संबोधले जाते. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर आषाढ महिन्यात या देवतेचे पूजन करून उत्तम पीक पाण्यासाठी साकडे घातले जाते.

महिला आणि मुली एकत्रित येऊन कुंभाराच्या घरातून मातीपासून बनविलेल्या ‘गुळ्ळव्वा देवी’ची पूजा करतात. विधिवत आवाहन करून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास करून या देवीची पूजा केली जाते. या देवीला संपत्तीची देवता म्हणूनही संबोधित केले जाते. शेतात पिकविल्या जाणाऱ्या धान्यांची आरास केली जाते. काही ठिकाणी ‘गुळ्ळव्वा देवी’ची मातीची मूर्ती बनवून देखील पूजा करण्यात येते. उत्तर कर्नाटकातील विविध भागात विविध विधींच्या माध्यमातून या देवीची पूजा करण्यात येते.
पाच आठवडे चालणाऱ्या या उत्स्वरूपी समारंभात मुली, महिला मोठ्या उत्साहात अनेक कार्यक्रम साजरे करतात. नातेवाईक, शेजारी, मित्रपरिवाराच्या घरोघरी जाऊन हा उत्सव साजरा केला जातो. विविध प्रकारचे अन्नपदार्थ, मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात. ग्रामीण भागातील वैविध्यपूर्ण रीतिरिवाज जपण्यासाठी अशा अनेक प्रथांचे आयोजन आजही करण्यात येते. उत्तर कर्नाटकात साजऱ्या होणाऱ्या ‘गुळ्ळव्वा देवी’च्या उत्सवावरदेखील अनेकांची श्रद्धा आणि विश्वास आहे. या उत्सवाला विशेष असे महत्व आहे.
विजापूर तालुक्यातील नागठाण गावात या परंपरेनुसार ‘गुळ्ळव्वा देवी’ उत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बंडे कुटुंबातील सदस्यांनी सहभाग घेत ‘गुळ्ळव्वा देवी’चा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.


Recent Comments