बेळगाव विभागाचे प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांची अचानक बदली करण्यात आली आहे. काल, सोमवारी सायंकाळी उशिरा सरकारने हा आदेश बजावला.
प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांची बेळगाव विभागाच्या प्रादेशिक आयुक्त पदावरून बदली करून बेंगळूर विभागाच्या प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तत्काळ प्रभावाने ही बदली केल्याचे प्रशासन आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे अधीन सचिव नागप्पा परीट यांनी बदली आदेशात म्हटले आहे. बिस्वास यांच्यासह राज्यातील अन्य काही ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचाही बदल्या करण्यात आल्या आहेत.
बेळगावचे प्रादेशिक आयुक्त म्हणून अम्लान आदित्य बिस्वास यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या काळात बेळगाव लोकसभा पोट निवडणूक, विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य मतदारसंघ, पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक, तसेच हुबळी व बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक आदी महत्वाच्या निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्या होत्या.
खास करून बेळगावच्या बीम्स सरकारी इस्पितळातील अनागोंदी थांबविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी त्यांची बीम्सच्या प्रशासकपदी केलेली निवड त्यांनी सार्थ करून दाखवली. कठोर निर्णय घेऊन त्यांनी बीम्स प्रशासनातील अनागोंदी दूर करून बीम्सचा लौकिक वाढविला. बीम्सच्या सुधारणेसाठी उद्योजक आणि दानशूरांकडून आर्थिक मदत मिळ्वण्यातही ते यशस्वी ठरले होते. एक कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे.


Recent Comments