विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला निघालेल्या बेळगावच्या दोन वारकऱ्यांचा कार उलटल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला तर अन्य तिघेजण जखमी झाले. हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे झाला.
जखमींवर पंढरपूर येथील लाईफलाईन इस्पितळात उपचार सुरु आहेत.
पंढरपूर तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर-सांगोला मार्गावर कासेगाव फाट्याजवळ काल मध्यरात्री बेळगावहून पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांची टियागो कार उलटल्याने दोघा वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर चालकासह तिघेजण जखमी झाले. राजू शिंदोळकर (वय ४५ वर्षे) आणि परशराम संभाजी झंगरूचे (वय ५०) दोघेही रा. भांदूर गल्ली, अनगोळ, बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. २६ वर्षीय गीतेश कोकितकर, २८ वर्षीय अभिजित हुंदरे आणि २६ वर्षीय वाहनचालक राजू कृष्णा मजूकर हे तिघे या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर पंढरपूर येथील लाईफलाईन इस्पितळात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या २ वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाआधीच जीवाला मुकावे लागले आहे. या दुर्घटनेने अनगोळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments