Belagavi

भाऊ कदम, भारत गणेशपुरे यांच्या हास्य कार्यक्रमात रसिक चिंब : Bharat Ganehspure and bhau kadam marathi famous comedians performing in Belagavi

Share

मी डान्स शिकलेली नाहीय, परंतु दुसऱ्यांना नाचवायचे मी चांगले शिकले आहे असे सांगत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या विरोधकांना टोला हाणला.

बेळगावात रविवारी सायंकाळी केएलई शताब्दी जिरगे सभागृहात राजू पवार फौंडेशनच्या वतीने कॉमेडी चॅरिटेबल शोचे आयोजन केले होते. यावेळी प्रसिद्ध मराठी विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’मधील विनोदवीर भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ. विजय देसाई यांनी स्वागत केले.

यावेळी बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, विविधतेत एकता हे चित्र जगात केवळ भारतातच पहायला मिळते. कोरोना काळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लोकांचे प्राण वाचविण्याचे प्रशंसनीय काम केले आहे. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी राजू पवार यांनी हा कार्यक्रम घेतला हे कौतुकास्पद आहे. मला डान्स करता येत नाही. परंतु दुसऱ्यांना कसे नाचवायचे हे चांगले शिकले आहे असे सांगत त्यांनी विरोधकांना टोला हाणला. यानंतर भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे यांचा हास्य कार्यक्रम पार पडला. त्यांनी सादर केलेल्या विनोदाच्या शिडकाव्यात रसिक प्रेक्षक खदखदून हसून चिंब झाले.

यानंतर कोरोना काळात उल्लेखनीय सेवा बजावलेल्या बेळगाव आणि परिसरातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर राजू पवार डान्स अकादमीच्या कलाकारांनी नृत्याचा कार्यक्रम सादर केला. त्यांनी चंद्रमुखी चित्रपटातील ‘चंद्रा’ आणि नटरंग चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यांवर सादर केलेल्या लावणी नृत्याला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. यानंतर मान्यवरांना स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. यावेळी केएलई काहेरचे कुलगुरू डॉ. विवेक सावोजी, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ, माजी अध्यक्ष डॉ. राजेश लाटकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बसवराज जेवरगी, राजू पवार डान्स अकादमीचे प्रमुख राजू पवार आदी उपस्थित होते.  

 

Tags: