सलग 8 वर्षांच्या लढ्यानंतर चिक्कोडीत बहुमजली न्यायालय संकुल उभारणीसाठी राज्य सरकारने 32 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानिमित्त वकील संघटनेने सरकार तसेच यासाठी प्रयत्न केलेल्या लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

चिक्कोडी वकील संघटनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष नागेश किवड म्हणाले, चिक्कोडीत न्यायालयाची नवीन इमारत व्हावी यासाठी सुमारे 8 लढा देण्यात आला. यासाठी मंत्री शशिकला जोल्ले, खा. अण्णासाहेब जोल्ले, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आदींनी प्रयत्न करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता बहुमजली न्यायालय संकुल उभारणीसाठी राज्य सरकारने 32 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कायदा मंत्री जे. सी. माधुस्वामी, सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील आणि मंत्री शशिकला जोल्ले यांचे वकील संघातर्फे आभार मानतो.
196 वर्षांचा इतिहास असलेल्या चिक्कोडी न्यायालयासाठी हायटेक इमारत बांधावी म्हणून सरकारला अनेकदा आवाहन करण्यात आले होते. चिक्कोडी भागातील लोकप्रतिनिधींनीही अनेकवेळा पाठपुरावा केला होता. नवीन इमारत मंजूर होऊन चार वर्षे लोटली आहेत. काही तांत्रिक कारणामुळे अनुदान मंजूर झाले नव्हते. मंत्री सहासिकल जोल्ले आणि खा. अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून आता मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानातून प्रशस्त पार्किंग, कॅन्टीन, इ-ग्रंथालय, वकील संघ कार्यालय यासह अन्य सोयी असणारे 3 मजली भव्य न्यायालयीन संकुल उभारण्यात येणार आहे असे ऍड. किवड यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला चिक्कोडी वकील संघाचे सचिव एल. व्ही. बोरन्नावर, बी. आर. यादव, एस. आर. हरके, एम. के. पुजेरी, आर. एम. बाकळे, कुमार खोत, एस. ए. जाधव, बी. आर. मठपती, आर. बी. हुद्दार, पुष्पक जनाज आदी उपस्थित होते.


Recent Comments