Belagavi

सुवर्णसौधमध्ये कार्यालये नेणे हा काश्मीरसारखा गंभीर प्रश्न नव्हे : महेश

Share

बेळगावातील सुवर्णसौधमध्ये सरकारी कार्यालये स्थलांतरित केल्यानेच विकास होईल असे मानणे चुकीचे आहे असे वादग्रस्त विधान भाजपचे मुख्य राज्य प्रवक्ता एम. जी. महेश यांनी आज बेळगावात केले. त्याचे कन्नड संघटनात तीव्र पडसाद उमटले आहेत.

बेळगावात आज, शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ता एम. जी. महेश म्हणाले, सुवर्ण विधानसौधमध्ये सरकारी कार्यालये स्थलांतरित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. हा काही काश्मीर प्रश्न नाही. सुवर्ण विधानसौधमध्ये सरकारी कार्यालये स्थलांतरित केल्यामुळेच विकास होईल असे म्हणणे चुकीचे आहे. या उलट जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे. कार्यालये स्थलांतरित केल्यामुळे केवळ इमारतीचा विस्तार वाढतो असे सांगत अप्रत्यक्षपणे कार्यालये स्थलांतराला विरोध व्यक्त केला. मंत्री उमेश कत्ती यांचे विधान पक्षाची भूमिका नाही. ते भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या विधानाशी भाजप सहमत नाही असे महेश यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप मुख्य प्रवक्ता एम. जी. महेश यांनी सुवर्णसौधमध्ये कार्यालये स्थलांतरित करण्याबाबतचे विधान केल्याबरोबर कन्नड संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी या विधानाला आक्षेप घेतला आहे. गेल्या अनेक्क वर्षांपासून सीमाभागाचा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही लढा देत आहोत, सुवर्णसौधमध्ये कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी आंदोलने करत आहोत, त्यात आता भाजप प्रवक्त्याने असे विधान करण्याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांची संमत्ती आहे का असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, भाजप प्रवक्ते महेश यांच्या विधानाला बेळगावात विरोध सुरु झाला आहे. सुवर्णसौधमध्ये कार्यालये स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी त्याचा निषेध केला आहे. आता हे प्रकरण कोणते वळण घेते हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.

 

 

Tags: