Chikkodi

धूळ खात पडली चिक्कोडी पालिकेची नवी इमारत

Share

चारपाच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीत चिक्कोडी नगरपालिकेचे अद्याप स्थलांतर झालेले नाही. विशेष म्हणजे उदघाटन होऊनही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अद्याप येथून प्रशासकीय कामकाज पाहिले जात नाहीय. याबाबत पेश आहे हा विशेष रिपोर्ट

होय, चिक्कोडी नगरपालिकेची इमारत शिथिल, जीर्ण झाल्याने पाच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून चिक्कोडीत नवी इमारत बांधण्यात आलीय. परंतु तेथून प्रशासकीय कारभार हाकण्यात अधिकाऱ्यांनी रस दाखवलेला नाही. कार्यालय स्थलांतराअभावी नवीन इमारत धुळ खात पडून आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचे ती आश्रयस्थान बनली आहे. एवढेच नव्हे तर चक्क अवैध धंद्यांचा अड्डा बनत चाललीय. ती आहे चिक्कोडी नगरपालिकेची नवी इमारत !   होय चिक्कोडी शहरातील नगरपालिकेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने 2016-2017मध्ये राज्य वित्त आयोगाच्या विशेष अनुदानातून सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून नगरपालिकेची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. त्याला आता पाच वर्षे लोटली आहेत. स्थानिक आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या या इमारतीचे उदघाटनही त्यांच्याच हस्ते पार पडले आहे. तरीदेखील नगरपालिकेचे कामकाज या इमारतीतून सुरु न झाल्याने चिक्कोडीवासियांतून संताप व्यक्त केला जातोय. उदघाटन होऊनदेखील या इमारतीतून प्रशासकीय कामकाज सुरु झाले नसल्याने आता नागरिकांनी या इमारतीचा पार्किंग स्लॉटसारखा वापर सुरु केलाय. कोणीही कशाही पद्धतीने येथे पार्किंग करू लागलेत. भटक्या कुत्र्यांनी येथे आश्रय घेण्यास प्रारंभ केलाय. आवारात झाडे-झुडुपे उगवली आहेत. दारू-जुगार सारख्या अवैध धंद्यांचा ही इमारत अड्डा बनत चाललीय. याबाबत नगरपालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, आता तेथे निगराणी ठेवण्यासाठी सुरक्षरक्षकाची नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले. तेथे पाण्याची समस्या आहे, ती दूर करून येत्या ऑगस्ट महिन्यात कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतर करण्यात येईल असे मुख्याधिकारी एस. आर. रुगी यांनी सांगितले.

एकंदर, राजकीय नेत्यांमधील श्रेयवादाची स्पर्धा, अधिकाऱ्यांचे दुर्लख यामुळे चिक्कोडी पालिकेची नवीन इमारत धूळ खात पडली आहे. अधिकाऱ्यांनी मात्र याकडे काणाडोळा केला आहे.

Tags: