केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे आणि संरक्षण क्षेत्राचे नुकसान होणार असल्याचा आरोप करून योजना मागे घेण्याच्या मागणीसाठी हुक्केरी व संकेश्वर ब्लॉक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज हुक्केरीत निदर्शने केली.

हुक्केरीतील प्रशासकीय भवनासमोर आज, मंगळवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अग्निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. हुक्केरी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विजय रवदी आणि संकेश्वर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संतोष मुडशी यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार जनविरोधी धोरणे अवलंबत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय रवदी म्हणाले, केंद्र सरकारने कुठलीही चर्चा, विचार न करता सैन्यभरतीसंदर्भात तडकाफडकी अग्निपथ योजना आणली आहे. देशातील सैन्यभरतीसाठी इच्छुक युवकांचे नुकसान या योजनेमुळे होणार आहे. अशाने केंद्र सरकार देशातील युवकांच्या भविष्याशी खेळ करीत आहे असा आरोप करून योजना मागे घेण्याची मागणी केली.
काँग्रेस नेते बसवराज पाटील म्हणाले, भाजपचे केंद्रातील सरकार देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर करून सूडबुद्धीने बेकायदेशीरपणे विरोधी पक्षांना जेरीस आणण्याचे काम करत आहे. विरोधी पक्ष, त्यांचे नेते, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप ठेवून नाहक त्रास देत आहेत हे निषेधार्ह आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस नेते सलीम कलावंत, शानूल तहसीलदार, कबीर मलिक, चंद्रशेखर गंगण्णावर, भीमगौडा अम्मनगी, भीमाप्पा चौगला, डी. आर. खाजी, दिलीप होसमनी, जितू मर्डी, रेखा चिक्कोडी, महेश हट्टीहोळी, मुरुगेश अथणी, रेखा दादुगोळ, संगीत मादर, जिनगौडा पाटील, इर्शाद मोकाशी आदी उपस्थित होते.


Recent Comments