Belagavi

… म्हणे म. ए. समितीची मागणी अर्थहीन : पालकमंत्री गोविंद कारजोळ यांचा जावईशोध MES senseless demand : Govind Karjol

Share

मराठी भाषेत सरकार कागदपत्रे देण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी अर्थहीन असल्याचा जावईशोध लावत कर्नाटकात कन्नडच प्रशासकीय भाषा असल्याने कन्नडमध्येच सरकारी कागदपत्रे देण्यात येतील अशी दर्पोक्ती जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मारली.

मराठी भाषेत सरकार कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, म. ए. समितीचे लोक काही पाकिस्तानातून येथे येऊन दंगा करत नाहीयेत. तेही आमचे भाऊ-बंधू आहेत, मात्र त्यांच्यातील काही लोक पोरखेळ करत आहेत. त्यांना आम्ही बरोबर धडा शिकवू.

म. ए. समिती कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र आरोपपत्रात त्या कलमाचा उल्लेखच नसल्याचे पत्रकारांनी विचारताच पालकमंत्री कारजोळ म्हणाले, आम्ही यात राजकारण करत नाही. मराठी आणि कन्नड भाषिक भावा-भावाप्रमाणे राहिले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. सर्वच भाषिकांवर आमचे प्रेम आहे. कोणावरही द्वेष नाही. कर्नाटकात कन्नड हीच प्रशासकीय भाषा असल्याने त्यांनी सहकार्य केले पाहिजे यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

मराठीत कागदपत्रे देण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी अर्थहीन असल्याचा जावईशोध मंत्री कारजोळ यांनी लावला आहे. यावरून समाजात अशांतता माजवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये असा फुकटचा सल्लाही त्यांनी दिला. कन्नड भाषेत आमचे प्रशासन असल्याने कन्नडमध्येच आम्ही पत्रव्यवहार करतो. प्रसंगी सुप्रीम कोर्ट किंवा परराज्यांशी संपर्क करताना इंग्लिशचा वापर करतो. त्यामुळे समितीची मागणी अर्थहीन आहे, ती पूर्ण करण्याची गरज नाही. यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे हा उपाय नाही. हजारो वर्षांपासून ते आमच्यासोबत कन्नड प्रदेशात रहात आहेत. दुराभिमान सोडून त्यांनी प्रशासन आणि सरकारसोबत सहकार्य करावे यासाठी त्यांचे मन वळविण्यात येईल असे कारजोळ म्हणाले.

महाराष्ट्रातील राजकारणावर प्रतिक्रिया देताना कारजोळ म्हणाले, महाराष्ट्रात एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेना असे ३ पक्षांचे सरकार आहे. मुंबईत हिंदूंवर अत्याचार होत होता म्हणून तो रोखण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. शिवसेना आणि काँग्रेसचे कधीच जमले नाही. हे दोन पक्ष म्हणजे तेल आणि पाण्यासारखे कधीही एक न होणारे. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी अन्य दोन काँग्रेसशी हात मिळवला. त्यामुळेच त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले आहेत. काँग्रेसला कसलीही विचारधारा नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

मुडलगी भ्रूण सापडल्याप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर कारजोळ म्हणाले, सहा प्रकरणांत संपूर्ण सत्य बाहेर आल्याशिवाय कारवाई करता येत नाही. २ खाती आणि परजिल्ह्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. प्रांताधिकाऱ्यांकरवी चौकशी सुरु आहे. त्याचा अहवाल लवकरच मिळेल असे त्यांनी सांगितले.

 

 

 

Tags: