Belagavi

सी. एस. चन्नबसप्पा अँड सन्स मॉलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Share

उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध वस्त्रप्रावरणांचे दालन बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्स यांनी आता बेळगाव शहरातही पदार्पण केले आहे. संस्थेच्या बेळगावातील भव्य नूतन शोरुमचे आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले.

होय, बेळगाव आणि उत्तर कर्नाटकासाठी ही खरेच खुशखबर आहे. कर्नाटकातील वस्त्रप्रावरणांचे सुप्रसिद्ध व्यापारी असलेल्या बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्स यांनी आता बेळगावातही ग्राहकांसाठी भव्य शोरूम सुरु केली आहे. उत्तम दर्जा, रास्त भाव आणि उत्तम ग्राहक सेवा यामुळे राज्यात कपडेविक्रीच्या क्षेत्रात सदैव आघाडीवर असणाऱ्या बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्स यांच्या अधिकृत शोरूमचा बेळगावात प्रारंभ झाला आहे. शहरातील टिळकवाडीतील मिलेनियम गार्डनजवळ भव्य ५ मजली इमारतीत थाटलेल्या या शोरुमचे उदघाटन आज, रविवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फीत कापून केले. यावेळी मंत्री उमेश कत्ती, बैरती बसवराज, उद्योजक विजय संकेश्वर, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, बी. एस. चन्नबसप्पा कुटुंबीय यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री व मान्यवरांचे चन्नबसप्पा कुटुंबातील महिलांनी आरती ओवाळून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलताना बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्सचे संचालक बी. एस. चन्द्रशेखर म्हणाले, बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्सची स्थापना होऊन 84 वर्षे झाली आहेत. दावणगेरे येथे आमच्या 9 शाखा सुरु आहेत. हुबळीत आमची नवी शाखा सुरु करण्याचा मानस आहे. कोविडमुळे त्याला विलंब झाला आहे.  प्रभाकर कोरे यांच्यामुळे आम्हाला बेळगावात शाखा सुरु करण्याची संधी मिळाली आहे. आमच्या येथे सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. 150 रुपयांपासून ते २ लाख रुपये किंमतीच्या साड्या आहेत. 300 रुपयांपासून पुढे पुरुषांचे कपडे असून दर्जा, गुणवत्तेनुसार कपड्यांचे दर ठेवले आहेत. ग्राहकांना रास्त भाव आणि उत्तम सेवा देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या नमुन्याचे कपडे येथे उपलब्ध केले आहेत असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांत सर्वात मोठ्या शोरूमचे आज माझ्याहस्ते उदघाटन झाले आहे. बी. एस. चन्नबसप्पा कंपनीने गेल्या ५० वर्षांत साडी विक्रीच्या बाबतीतही नावलौकिक मिळवला आहे. दावणगेरे त्यांचे मुख्य व्यापार केंद्र आहे. आता बेळगाव आणि उत्तर कर्नाटकात संस्थेने आपला व्यवसाय विस्तार केला याचा आनंद आहे. या भागातील माता-भगिनी आणि युवकांना हवे तसले कपडे येथे उपलब्ध आहेत. लग्नासाठीचे बस्ते, कपडे येथे आहेत, त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे सांगून मुख्यमंत्री बोम्मई यांनी संस्थेला प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या.

एकंदर, संपूर्ण राज्यात वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवलेल्या बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्सने बेळगावात भव्य शोरूम सुरु केल्याचा आनंद बेळगावकरांना झाला आहे. आता कपडे खरेदीसाठी इकडे-तिकडे फिरण्याची काय गरज? बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्स शोरूमला भेट दिली की झाले. तुमच्या पसंतीचे, बजेटमधील दरात येथे कपडे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्हीही येथे एकदा अवश्य भेट द्या.

या कार्यक्रमाला खा. मंगल अंगडी, आ. महादेवप्पा यादवाड, लक्ष्मी हेब्बाळकर, दुर्योधन ऐहोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच बी. एस. चन्नबसप्पा कुटुंबीय उपस्थित होते.

Tags: