Belagavi

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती सरकार पुन्हा येणार : मंत्री मुरुगेश निराणी

Share

 

महाराष्ट्रात शिवसेनाभाजपात युती होऊन पुन्हा युती सरकार अस्तित्वात येईल असा विश्वास कर्नाटकचे उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी व्यक्त केला.

होय, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह पुकारलेल्या बंदमुळे महाराष्ट्रासह देशभरात एकच हलकल्लोळ माजला आहे. महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते अशी परिस्थिती आहे. या संदर्भात बेळगावात रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्योग मंत्री मुरुगेश निराणी म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन झाले त्या दिवसापासूनच हे सरकार कधीही कोसळेल अशी अटकळ होतील. वाहन चालविताना स्टेअरिंगसह सर्व काही एकाच्याच हातात असले पाहिजे. मात्र तेथे एकाच्या हाती स्टेअरिंग, दुसऱ्याच्या हाती एक्सिलेटर तर तिसऱ्याच कोणाकडे ब्रेक अशी परिस्थिती होती. त्यामुळे हे सरकार फार दिवस चालणार नाही हे आम्हाला आधीच ठाऊक होते असे निराणी म्हणाले.

शिवसेना गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करत आली आहे. इतकी वर्षे ज्यांना विरोध केला, त्यांच्याशीच समजूतीने राजकारण करायचे हे कार्यकर्त्यांना पटलेले नाही. हीच नाराजी आता बाहेर पडत आहे. सर्व साधक-बाधक शक्यता विचारात घेऊन महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार येईल हे निश्चित आहे असे निराणी यांनी सांगितले. शिवसेना-भाजप युती काही नवीन नाही. दोन्ही पक्षांचे जुने संबंध आहेत. काही किरकोळ मतभेदांमुळे ते दूर गेले असावेत. सुमारे २५ वर्षांपासून दोन्ही पक्षांचे सख्य आहे. तत्व-धोरणांमध्ये साम्य आहे. भावा-भावामध्ये किरकोळ मतभेद झाले तर ते काही काळ दूर होतात. पण ते कायमचे नसते असे निराणी म्हणाले.

स्वतंत्र राज्याबाबत उमेश कत्ती यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे असे सांगून निराणी म्हणाले, कत्ती यांचे विधान म्हणजे आमच्या पक्षाची किंवा आमच्या सरकारची अधिकृत भूमिका नाही. ते काय बोललेत हे मला माहित नाही. ते माझ्याहून वरिष्ठ आहेत. मी ३ वेळा एमएलसी झालोय, ते ९ वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. आपल्या स्वतःच्या अनुभवातून त्यांनी तसे विधान केले असावे असे मंत्री निराणी यांनी सांगितले.

एकंदर, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार पुन्हा येईल असा दावा मंत्री मुरुगेश निराणी यांनी केलाय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे तो निर्णय घेतील असा विश्वास मंत्री निराणी यांनी व्यक्त केलाय. आता पुढे काय होते ते पाहणे कुतूहलाचे ठरेल.

Tags: