Crime

Mudalgi 7 Embryos case : मुडलगीतील ते भ्रूण आपलेच : खासगी इस्पितळाची कबुली

Share

मुडलगीत बरण्यांत घालून नाल्यात टाकलेले ते भ्रूण आपल्याच इस्पितळातील असल्याची कबुली मुडलगी येथील कनकरेड्डी इस्पितळाने दिली असल्याचे समजते.

होय, बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथील बसस्थानकाजवळील नाल्यात काल, शुक्रवारी बरण्यांत भरून टाकलेले ७ भ्रूण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व भ्रूण ५ महिने पूर्ण झालेले आहेत. जिल्हा आरोग्य खात्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत हे भ्रूण कोण टाकले याचा शोध सुरु केला. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी मुडलगी पोलिसांच्या मदतीने गोकाक आणि मुडलगी शहरातील खासगी इस्पितळ आणि मॅटर्निटी होम्सवर छापे मारले. एका इस्पितळाच्या स्कॅनिंग सेंटरवरही छापा टाकण्यात आला.

त्यानंतर आज सकाळी संशयास्पद इस्पितळाना टाळे ठोकण्यात आले. सापडलेले ७ भ्रूण बेळगावातील विधिविज्ञान प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. याठिकाणी भ्रूण चाचणी करून अहवाल दिल्यानंतरच या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून बिनदिक्कत भ्रूणलिंग तपासणी करून गर्भपात करण्यात आल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुडलगीत सापडलेल्या भ्रूण प्रकरणी डॉ. कनकरेड्डी इस्पितळ आणि नवजीवन इस्पितळ यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी ही दोन्ही इस्पितळे सील करण्याचा निर्णय घेतला आहे. काल सापडलेले भ्रूण फार्मलिनमध्ये बरण्यांमध्ये साठवून ठेवण्यात आले होते. ते का साठवले होते याचा शोध जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग घेत आहे. याचदरम्यान कनकरेड्डी इस्पितळातीलच ते भ्रूण असल्याची कबुली डॉ. वीणा कनकरेड्डी यांनी दिल्याचे समजते. जुन्या इस्पितळातून नव्या इस्पितळात स्थलांतर करताना दाईजवळ विल्हेवाट लावण्यासाठी दिले होते असे त्यांनी त्यांच्या इस्पितळावरील छाप्यावेळी कबूल केले आहे.

 

Tags: