Belagavi

Satish Jarkiholi visit goundwad : गौंडवाडला आ. सतीश जारकीहोळी यांची भेट; सतीशचे कुटुंबीय, ग्रामस्थांना दिला धीर 

Share

पार्किंगच्या जागेवरून झालेला खून आणि हिंसाचारामुळे धगधगत असलेल्या बेळगाव तालुक्यातील गौंडवाड गावाला केपीसीसी कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डीचे . सतीश जारकीहोळी यांनी भेट देऊन मृत युवक सतीश पाटीलचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचे सांत्वन देऊन धीर दिला.

आ. सतीश जारकीहोळी यांच्या भेटीवेळी सतीश पाटील यांच्या आईने आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. माझा मुलगा निष्पाप आहे. ग्रामस्थांच्या सांगण्यावरून देवस्थानच्या जमिनीसाठी लढा देत होता. याच रागातून यापूर्वी तीनवेळा त्याच्या खुनाचा प्रयत्न झाला होता. आता वैऱ्यांनी डाव साधला. सतीशच्या खुन्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी तिने डोळ्यात पाणी आणून केली. पोलिसांनी आरोपीना सोडून केवळ बाहेरच्यांना नावासाठी अटक केली आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. या सगळ्यात पोलिसांचाच हात आहे असा आरोप केला.

यावेळी आ. सतीश जारकीहोळी यांनी मृत सतीश पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जारकीहोळी यांनी, पोलिसांच्या अपयशामुळेच गौंडवाडमध्ये खून व हिंसाचार घडल्याचा आरोप केला. काकती पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून काही अधिकारी व पोलीस ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यामुळे लोकांना न्याय मिळत नाहीय. या प्रकरणात पोलिसांनी केवळ 12 जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपी मोकाट आहेत. या प्रकरणाचा योग्य तपास करून याला कोण जबाबदार आहेत त्या सर्वाना अटक झाली पाहिजे, निष्पापांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. या भेटीत ग्रामस्थांची सभा घेऊन बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, गौंडवाड ग्रामस्थांनी भीती बाळगण्याची गरज नाही. ग्रामस्थांना त्रास होऊ नये यासाठी मी पोलीस आयुक्तनाशी चर्चा करेन, त्याचप्रमाणे सतीश पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, प्रदीप एम. जी.,मलगौडा पाटील, पूजा सतीश पाटील, नलिनी पाटील, सुमन पाटील, गंगाराम पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: