गौंडवाड गावातील सतीश पाटील या युवकाच्या खुन्यांना कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी सतीश पाटील याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

होय, गेल्या अनेक वर्षांपासून सतीश पाटील मंदिराची जमीन लाटलेल्यांशी लढा देत होता. हे सहन न झालेल्या काही समाजकंटकांनी सतीश पाटील यांचा खून केला आहे असा आरोप सतीश पाटील यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. यावेळी आपल्याला न्याय मिळावा यासाठी सतीशच्या पत्नीने हंबरडा फोडला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीशची पत्नी पूजा यांनी मला न्याय मिळण्याची मागणी करण्यासाठीयेथे आल्याचे डबडबलेल्या डोळ्यांनी सांगितले. माझा पती न्यायासाठी लढला. विरोधी गटातील लोकांनी देवस्थानची जागा प्लॉट पाडून विकली होती. ती माझ्या पतीला आणि सगळ्या गावाला माहित पडले. देवस्थानची जागा देवस्थानला परत मिळावी यासाठी संघर्ष करणाऱ्या माझ्या पतीला त्या दुष्टानी निर्घृण पद्धतीने ठार केले आहे. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे सांगत पूजाने टाहो फोडला.
ग्रामस्थ विद्या कुट्रे म्हणाल्या, भर गावात लहान मुले आणि कुटुंबीयांसमोरच सतीश पाटीलचा निर्घृण खून करण्यात आलाय. त्यामुळे कायदा आणि पोलिसांचे भय मारेकऱ्यांना नाही हे सिद्ध झालेय. खून केल्यानं पकडायचे सोडून पोलीस उलट सतीशच्या कुटुंबीयांनाच धमकी देत आहेत. सतीशच्या खुन्यांना फाशीची शिक्षा देऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी निदर्शकांनी केली.
दरम्यान, या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, युवकाच्या खूनप्रकरणी त्याचे कुटुंबीय आणि गौंडवाड ग्रामस्थांनी निवेदन देऊन मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या प्रकरणी १० जणांना अटक केल्याची माहितीपोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आणखी १५ आरोपीना अटक करण्यासाठी पोलिसांनी जाळे विणले आहे. कुटुंबीयांनी आपल्याला योग्य सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. त्यांना पोलीस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. पाहणी करून आवश्यकतेनुसार अधिक सुरक्षा पुरविण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी स्नेहा पाटील, नलिनी पाटील. प्रियांका पाटील यांच्यासह गौंडवाडचे अनेक स्त्री-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments