धर्मभूमी मानलेल्या भारतात योगाला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. श्री जगद्गुरू रेणुकाचार्यांनीही वीरशैव धर्माच्या शिवयोगाचरणात योगाचे महत्व सांगितले आहे असे बाळेहोन्नूरच्या रंभापूरी मठाचे डॉ. वीरसोमेश्वर जगद्गुरू यांनी सांगितले.

बेळगावातील लक्ष्मी टेकडी येथील हुक्केरी हिरेमठाच्या शाखा मठात सोमवारी मोफत योग प्रशिक्षण शिबिराच्या चौथ्या दिवशी रंभापूरी मठाचे डॉ. वीरसोमेश्वर जगद्गुरू यांनी हजेरी लावून आशीर्वाद दिले. यावेळी ते म्हणाले, आरोग्याचे ज्ञान सगळ्या ज्ञानात महत्वाचे आहे. सगळ्या संपत्तीपेक्षा आरोग्य संपत्ती मोठी आहे. ती राखण्यासाठी आमच्या पूर्वजांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्व सांगितले आहे.
आमच्या ऋषी मुनींनी योगसाधना करून दीर्घायुषी राहण्याचा विक्रम केला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांनाच ताणतणावाचा, आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिवसातून केवळ अर्धा तास योगसाधना केल्याने मनाला शांतता आणि सदृढ आरोग्य लाभते. तयासाठी सर्वानी योगसाधना करावी असे आवाहन स्वामीजींनी केले.
शिबिरात हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, संगोळ्ळी हिरेमठाचे गुरुलिंग शिवाचार्य स्वामीजी, चंदरगी हिरेमठाचे नियोजित उत्तराधिकारी रेणुक गडदेश्वर देवरु, बैलहोंगल शक्ती देवालयाचे महांतेश शास्त्री, डॉ. पद्मनाभ दरबारे, सवनूरचे डॉ. गुरुपादय्या सालीमठ, योगगुरू अमोघ जैन यांच्यासह योग शिबिरार्थी आदी उपस्थित होते.


Recent Comments