अग्निपथ विरोधातील बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करण्यात येत असून ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही नजर ठेवण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात आज काही युवकांनी समाजमाध्यमांवरून बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेल्या व्यापक बंदोबस्ताबाबत पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी माहिती दिली. समाजमाध्यमांवरून काहींनी बंदची हाक दिल्याने बेळगावात आज काहींनी आंदोलन करण्याची तयारी केल्याची माहिती मिळाली होती. यासाठी कोणीही पोलिसांकडे पूर्वानुमती मागितलेली नव्हती. त्यामुळे बंदचा जनतेला त्रास होऊ नये यासाठी आज कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी गेल्या ३ दिवसांपासून नियोजन केले आहे. आमचे अधिकारी आज शहरात गस्त घालून सुरक्षा उपलब्ध करण्याचे काम करत आहेत.
जनतेला अधिक सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या हेतून काही ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करण्यात येत आहे. त्याशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात येत आहे. बेळगावातील चन्नम्मा चौक, रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी अधिक कुमक ठेवली आहे. जनतेला विनाकारण त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे जाहीर केलेले आहे. विनाकारण बंद पाळून कोणीही जनतेला त्रास देऊ नये. आपल्या भविष्याचा विचार करून युवकांनी आंदोलनात भाग घेऊ नये असे सांगितले आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासूनच आमचे अधिकारी व पोलीस गस्त घालत असून अनुचित प्रकार हाणून पाडण्याची सर्व तयारी केली आहे. नाकाबंदी करून उपाय योजना केली आहे असे त्यांनी सांगितले.


Recent Comments