Belagavi

२७ जूनचे आंदोलन : समिती नेत्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Share

सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेतूनच सरकारी कागदपत्रे, दाखले देण्याच्या मागणीसाठी येत्या २७ जून रोजी भव्य आंदोलन करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. या संदर्भात समिती नेत्यांनी आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

होय, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखालील म. ए. समिती नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज, सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन नियोजित आंदोलनाविषयी चर्चा केली. महाराष्ट्र एकीकरण समितीने आजवरचे सगळे लढे शांततेच्या आणि लोकशाहीपुर्ण मार्गानेच केले आहेत. त्यामुळे २७ जूनचे नियोजित आंदोलनही त्याच पद्धतीने केले जाईल अशी ग्वाही शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून सरकारी कागदपत्रे मिळावीत यासाठी गेली अनेक वर्षे आम्ही लढा देत आहोत. पण कर्नाटक सरकारने आमच्या मागण्या अद्याप मान्य केलेल्या नाहीत. देशात अन्य सर्व राज्यांत भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या मातृभाषेत सरकारी कागदपत्रे दिली जातात. मात्र कर्नाटकात आम्हाला न्याय दिला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या २७ जून रोजी बेळगावात यासाठी भव्य आंदोलन करण्यात येणार आहे असे दळवी यांनी सांगितले.

या भेटीवेळी समिती नेते प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.

 

Tags: