अग्निपथ योजनेच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांना पोलीस छावण्यांचे स्वरूप आले आहे. दैनंदिन जनजीवन मात्र सुरळीत सुरु आहे.

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ या योजनेच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी हिंसक विरोध करण्यात येत आहे. बेळगावातही योजनेच्या विरोधात समाजमाध्यमांवरून आज बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर काल, रविवारी सायंकाळपासून पोलीस यंत्रणा कामाला लागली. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांनी संचलन केले होते. त्यानंतर आज चौका-चौकात आणि प्रमुख रस्त्यांवर आणि संपूर्ण शहरातच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दैनंदिन जनजीवन मात्र नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु आहे.
सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहराच्या प्रवेशद्वारांत चौक आणि रस्त्यावर हातात काठ्या घेऊन पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नागरी पोलिसांबरोबरच केएसआरपी, डीएआर तसेच जलद कृती दलाचे जवान नेमण्यात आले आहेत. शहरातील चन्नम्मा चौक, अशोक चौक, सीबीटी, आरपीडी कॉर्नर आदी ठिकाणी चोख फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातही युवकांच्या आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटू नयेत यासाठी प्रमुख शहरात व अन्यत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बेळगावात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या सिटी राउंड घालून बंदोबस्ताचा आढावा घेतला. डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस खडा पहारा देत आहेत.
चन्नम्मा चौकात जलद कृती दलाच्या २ तुकड्या तैनात केल्या आहेत. हातात एके-४७ घेऊन रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान उभे आहेत. युवकांनी कुठंही जमा होऊ नये याची दक्षता पोलीस घेत आहेत. हत्तरगी, हिरेबागेवाडी टोल नाका गेट येथेही फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


Recent Comments