Belagavi

गौंडवाडमध्ये युवकाचा खून; दगडफेक, वाहनांची जाळपोळ : गावात अद्याप तणाव

Share

बेळगाव तालुक्यातील गौंडवाड गावात काळभैरव देवस्थानच्या जागेवरून पूर्व वैमनस्यातून युवकाचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्यानंतर घरांवर दगडफेक करून सहा वाहनांची जाळपोळ करण्यात आली. गवत गंजींनाही आग लावण्यात आली. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तथापि, आज दुसऱ्या दिवशीही गावातील तणाव कायम आहे.

काळभैरव देवस्थानच्या जागेवरून गौंडवाड गावात २ गटांत जुना वाद आहे. या जागेवर उभे केलेले वाहन हटविण्यास सांगितल्याने ४० वर्षीय सतीश राजेंद्र पाटील या युवकाचा खून केल्याची घटना गौंडवाड येथे काल, शनिवारी रात्री घडली. व्यवसायाने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेला सतीश गावात आघाडीचा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याचा खून झाल्याचे समजताच गावकऱ्यांत संतापाची लाट पसरली. त्यानंतर २ गटांत संघर्ष होऊन घरांवर दगडफेक करण्यात आली. काही गवत गंज्याना आग लावण्यात आली. त्याशिवाय कार, ट्रॅक्टर, रिक्षासह ६ हुन अधिक वाहनांनाही आग लावून ती पेटवून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी राखीव पोलिसांसह गौंडवाड येथे धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आज दुसऱ्या दिवशीही गावात परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी तणावपूर्ण आहे.

Tags: