माझ्या विजयाचा आनंद जरूर आहे. पण अरुण शहापूर यांच्या पराभवाचे दुःख वाटते अशी प्रतिक्रिया वायव्य पदवीधर मतदार संघातील भाजपचे विजयी उमेदवार हनुमंत निरानी यांनी दिली.

बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या वायव्य पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार हनुमंत रुद्रप्पा निरानी यांनी अभूतपूर्व विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुनील संक आणि हनुमंत निरानी यांच्यात थेट टक्कर होती. काल जाहीर झालेल्या निवडणूक निकालात भाजपचे उमेदवार हनुमंता निरानी हे 44815 मते मिळवून दुसऱ्यांदा विजयी झाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केला.
निरानी म्हणाले, गेल्या सहा वर्षांत अरुण शहापूर यांनी अतिशय सक्रिय राहून काम केले आहे. ते आणि मी पदवीधर आणि शिक्षक दोन्ही मतदार संघात मिळून काम केले. मतदार आम्हा दोघांनाही आशीर्वाद देतील, अशी आशा होती. मात्र शहापूर यांना मतदारांनी आशीर्वाद न दिल्याने मी अत्यंत निराश झालो आहे. गेल्या १२ वर्षांत त्यांनी क्रियाशील राहून चांगला लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यांच्या पराभवाने मी दुःखी झालो आहे असे निरानी म्हणाले.
निरानी यांच्याप्रमाणे अरुण शहापूर यांना राजकीय पार्श्वभूमी नसल्यानेच त्यांचा पराभव झाला का?, अरुण शहापूर हे पूर्णपणे निराणींवर अवलंबून होते का, या प्रश्नाला उत्तर देताना निरानी म्हणाले, कोणीही कोणावर अवलंबून नाही. शहापूर वयाने माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. मात्र राजकारणात माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे आहेत. मतदारांच्या भावनांचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. मतदारांनी त्यांना नाकारण्याची अनेक कारणे आहेत. मला आज मतदारांचे आभार मानायचे आहेत. जन्म दिलेल्या आईचा, वाढवलेल्या भूमीचा, शिकवलेल्या शाळा आणि गुरुजींचा आणि आशीर्वाद दिलेल्या मतदारांचा मी ऋणी आहे असे निरानी यांनी सांगितले.
एकंदर, विजयी उमेदवार हनुमंत निरानी यांनी अरुण शहापूर यांच्या पराभवाला अधिक महत्त्व दिले आहे. अरुण शहापूर यांच्या पराभवाची अनेक कारणे आहेत, त्यांचे आत्मवलोकन करणे गरजेचे आहे असे निरानी यांनी म्हटले आहे.


Recent Comments