Belagavi

ग्राहक आयोगाच्या पीठासाठी बेळगावात वकिलांची निदर्शने

Share

बेळगाव जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बेळगावमध्ये स्थापन करण्यात येणारे कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाचे पीठ कलबुर्गी येथे सुरु केल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली.

होय, बेळगावात सुरु करावयाचे कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाचे पीठ कलबुर्गी येथे कार्यान्वित झाले आहे. याच्या निषेधार्थ बेळगावात आज बुधवारी बेळगाव वकील संघटनेतर्फे रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली. राणी चन्नम्मा चौकात संतप्त वकिलांनी रस्ता अडवून निदर्शने करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी म्हणाले, मंत्री उमेश कत्ती यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेत्यांना ग्राहक आयोगाचे पीठ बेळगावात स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र एकही नेत्याने यात लक्ष घातले नाही. आमच्या जिल्ह्यात एवढे मंत्री असताना बेळगावात ग्राहक पीठ न होता कलबुर्गीत स्थापन केले आहे हे विषादनीय आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके म्हणाले, बेळगावात ग्राहक आयोगाचे पीठ स्थापण्याची मागणी जुनी आहे. त्यामुळे बेळगावातील वकिलांना नेऊन मी प्रयत्न केले आहेत. मंत्री उमेश कत्ती यांच्यासमवेत मुख्यमंत्र्याना भेटून बेळगावात पीठ स्थापन करण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यानीही त्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र गेल्या २ दिवसात कलबुर्गीत पीठ सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे याबाबत पालकमंत्री गोविंद कारजोळ आणि मंत्री उमेश कत्ती यांच्याशी चर्चा करणार आहे. बेळगावातच ग्राहक पीठ स्थापन करण्याची मागणी वकिलांसोबत त्यांच्याकडे करणार असल्याचं आ. बेनके यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव वकील संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags: