Belagavi

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात माकड मृत्युमुखी; कार्यकर्त्यांकडून अंत्यसंस्कार 

Share

बेळगावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या माकडावर सामाजिक कार्यकर्त्यांनी शहापूर स्मशानानजिक अंत्यसंस्कार केले.

आदर्श नगर वडगाव येथील मेघदूत कॉलनी उद्यानाजवळ भटक्या कुत्र्यांनी एका माकडावर हल्ला करून त्याला मारून टाकले. या भागातील काही नागरिकांनी ही घटना महापालिका सफाई कामगारांना कळवून मेलेल्या माकडाला कचरा गाडीतून नेण्याची विनंती केली.

मात्र कचरा गाडीवर असणाऱ्या राजेश  गोल्लर यांनी सामाजिक कार्यकर्ते आणी स्वच्छता प्रभाग निरीक्षक संजय पाटील यांना याबद्दल कळविले. संजय पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना संघटक रवींद्र जाधव तसेच मायक्रो औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी रमेश देसुरकर, सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील यांना याबद्दल माहिती दिली. या सर्वांनी सदर मृत माकडाला शहापूर स्मशानभूमी नजीकच्या गायरान आवारात आणून तेथे त्याच्यावर अंतिम संस्कार केले.

संजय पाटील, रमेश देसुरकर आणि रवींद्र जाधव यांनी यावेळी त्या मृत माकडाला आदरांजली वाहिली. तसेच महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. माकडावर अंतिम संस्कार करताना संजय पाटील, रमेश देसुरकर, रवींद्र जाधव यांना राजेश गोल्लर, सफाई कामगार सुरज कांबळे, रमेश कोलकार, उळवाप्पा कोलकार, फकिराप्पा भोमन्नावर, राकेश कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

संजय पाटील नेहमीच सेवाभावी कार्यासाठी लोकांच्या अडीअडचणीला धावून जातात. ते एक आघाडीचे रक्तदाते आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल उपस्थितांतून समाधान करण्यात आले.

Tags: