वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरातील सरकारी कन्नड शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु झाली.

विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी सकाळी बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरातील सरकारी कन्नड शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. बेळगाव, बागलकोट आणि विजापूर हे ३ जिल्हे मिळून बनलेल्या या मतदारसंघासाठी १९० मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. सकाळी ८ ला सुरु झालेले मतदान सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. मतदान केंद्रांभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिक्षक मतदार संघातील मतदानासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका छापण्यात आली आहे. तर ‘पदवीधर’साठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका आहे. एकाच मतदान केंद्रात दोन्ही मतदार संघाच्या मतदानाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 
वायव्य शिक्षक मतदार संघात 17,238 पुरुष तर 8,150 महिला मतदार आहेत. बेळगाव जिल्ह्यात 13,287, बागलकोट जिल्ह्यात 5173 तर विजापूर जिल्ह्यात 6928 मतदार असे एकूण 25,388 मतदार आहेत. वायव्य पदवीधर मतदार संघात एकूण 99,598 मतदार असून त्यापैकी 71,040 पुरुष तर 28,554 महिला मतदार आहेत. बेळगाव जिल्ह्यात 45,124, बागलकोट जिल्ह्यात 33,651 तर विजापूर जिल्ह्यात 20,823 मतदार आहेत. पदवीधर मतदार संघात एकूण 11 उमेदवार आहेत. परंतु खरी लढत भाजपचे हनुमंत निरानी आणि काँग्रेसचे सुनील संक यांच्यातच आहे.
वायव्य शिक्षक मतदार संघात एकूण 12 उमेदवार आहेत. परंतु खरी लढत भाजपचे अरुण शहापूर आणि काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी यांच्यातच आहे. याशिवाय जेडीएसचे चंद्रशेखर लोणी, अपक्ष एन. बी. बन्नूर हेसुद्धा रिंगणात आहेत. मतदानासाठी सरकारने सर्व पात्र मतदारांसाठी संदर्भिक रजा मंजूर केली आहे. ‘पदवीधर’मधील मतदारांना उजव्या हाताच्या अंगठयाशेजारील बोटाला तर शिक्षक मतदार संघातील मतदारांना उजव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्यात येत आहे. पसंतीक्रमानुसार मतदान करण्यात आले. पहिल्या पसंतीचे मत देणे बंधनकारक आहे. अन्य मते ऐच्छिक आहेत. मतदान केंद्रावर मोबाईल, शाईचे पेन नेण्यास बंदी घालण्यात आली. 
दरम्यान, निवडणुकीसाठी तैनात केलेल्या पोलीस बंदोबस्ताची माहिती देताना शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या म्हणाले, निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. बूथ लेव्हलपासून सुपरव्हिजनपर्यंत योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस देखील काळ रात्रीच मतदान केंद्रावर हजर होऊन त्यांनी येथेच वास्तव्य केले आहे. आज सकाळपासून मतदान सुरळीत सुरु झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख व्यवस्था केली आहे. निवडणूक शांततेत, सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन मिळून काम करत आहे. महिला निवडणूक कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल बोलताना यापुढे असा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात येईल असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
एकंदर विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात येत असून, बुधवारी १५ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.


Recent Comments