Vijayapura

विजापुरात ‘शिक्षक-पदवीधर’ निवडणुकीची तयारी पूर्ण

Share

उद्या होणाऱ्या कर्नाटक वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणुकीसाठी विजापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. शांततेत सुरळीत मतदान पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.

कर्नाटक वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणुकीसाठी क्षनगणना सुरु झाली आहे. उद्या सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतपेट्या बेळगावातील क्लब रोडवरील ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यात येणार असून त्या ठिकाणीच १५ जूनला मतमोजणी होणार आहे. वायव्य शिक्षक मतदार संघात एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. तर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात ११ उमेदवार आहेत. विजापूर जिल्ह्यात वायव्य शिक्षक मतदार संघात ४९८५ पुरुष तर १९४३ महिला मिळून एकूण ६९२८ मतदार आहेत. तर वायव्य पदिशर मतदारसंघात १५,७२२ पुरुष आणि ५१०० महिला मतदार मिळून एकूण २०,८२३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

वायव्य शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मूळची ४० व अतिरिक्त ७ अशी एकूण ४७ मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी मायक्रो ऑब्जर्व्हर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर २ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित तालुक्यांच्या तहसील कचेरीतच मस्टरिंग आणि डी मस्टरिंग करण्यात येणार आहे. विजापूर जिल्ह्यात ३६ रूटवर वाहनांची व्यवस्था केली आहे. निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मद्यविक्रीस बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे रविवारी ११ जूनच्या सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १४ जूनपर्यंत १४४ कलम जारी करण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी डॉ. विजयमहांतेश दानम्मानवर यांनी ही माहिती दिली.

निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस खाते महसूल खात्याला सर्वप्रकारचे सहकार्य करणार आहे असे एसपी एच. डी. आनंदकुमार यांनी सांगितले. ४७ मतदान केंद्रांसाठी ३ डीवायएसपी, ११ सीपीआय, १६ पीएसआय, १८ एएसआय, ८० हवालदार १९३ नागरी पोलीस आणि १२ डीएआर, ३ केएसआरपी व आयआरबी तुकड्या असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ४७ मतदान केंद्रांपैकी २९ सामान्य, १५ संवेदनशील व ३ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओग्राफर, एएसआय, २ हवालदार असा बंदोबस्त राहणार आहे. सामान्य मतदान केंद्रात २ हवालदार आणि २ पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

Tags: