बेळगावात अम्मा–भगवान मंदिराच्या उदघाटनानिमित्त रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

बेळगावातील सदाशिव नगरात अम्माभगवान मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या उदघाटनानिमित्त आज, रविवारी अम्माभगवान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून सकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर कॉलेज रोड, चन्नम्मा चौक, आंबेडकर रोड या मार्गावरून सदाशिव नगरातील मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला भक्तांनी मंगल कलश घेऊन, हाती धर्मध्वज घेऊन भक्तिभावाने नृत्य करत मिरवणुकीत सहभाग घेतला. सजवलेल्या बैलजोड्या, पारंपरिक वाद्य मेळ्याने मिरवणुकीची शान आणखी वाढवली. पारंपरिक पोशाख परिधान करून, फेटे बांधून स्त्री-पुरुष भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

यावेळी ‘आपली मराठी’ला माहिती देताना चिदानंद जकाती आणि राजू चौगुले यांनी सांगितले की, बेळगावात अगदी छोट्या प्रमाणात सुरु झालेल्या अम्मा भगवान संप्रदायात आज हजारो भक्त सहभागी झाले आहेत. भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्याने त्यांची श्रद्धा वाढली आहे. अम्मा भगवान मंदिर उदघाटनानिमित्त जलदीक्षा, पादुका अभिषेक आदी धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे असे त्यांनी सांगितले.

एकंदर अम्मा भगवान मंदिर उदघाटनानिमित्त बेळगावात आज उत्साहात भव्य मिरवणूक पार पडली. भक्तांनी उत्साहात भाग घेऊन ती यशस्वी केली. मिरवणुकीनंतर मंदिराजवळ आयोजित महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला.


Recent Comments