बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट आवारातील बेकायदा खोकी, दुकाने महापालिका अधिकाऱ्यांनी आज हटवली.

होय, बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट आवारातील बेकायदा खोकी, दुकाने हटविण्याची मोहीम आज महापालिका अधिकाऱ्यांनी राबवली. शुक्रवारी सकाळी-सकाळीच महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही मोहीम राबवून सुमारे १५ खोकी काढून टाकली. पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी स्वतःच्या देखरेखीखाली ही मोहीम राबवली. 
यावेळी व्यापाऱ्यांशी चर्चा करताना पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट आवारात अशाप्रकारे दुकाने थाटणे बरोबर दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कार्यवाही करण्यास सांगितले आहे. ही सगळी दुकाने एकाच ठिकाणी व्यवस्थित सुरु करण्याची आणि पार्किंगसाठी व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. त्यामुळे सगळ्यांची योग्य व्यवस्था करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. 
यावर व्यापाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता दुकाने हटविल्यावरून आक्षेप घेतला. त्यावर ही तुमची स्वतःची जागा नव्हे, सरकारी जागा आहे. तुम्हाला पर्यायी व्यवस्था करून देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार व्यवस्था करण्यात येईल अशी व्यापाऱ्यांची समजूत पालिका आयुक्तांनी घातली.
एकंदर, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट आवारात थाटण्यात आलेली खोकी पालिकेने आज हटवली आहेत. त्या व्यापाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. ते बेळगाव मनपा पाळते का हे पाहणे कुतूहलाचे ठरेल. 


Recent Comments