गोल्याळीच्या सरकारी उच्च प्राथमिक शाळेमध्ये आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करून विध्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.

गोल्याळी गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत कित्येक वर्षांपासून शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती होत नाही., किंवा ग्रामीण भाग असल्याने येथे कोणी शिक्षक म्हणून रूजू होत नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून अतिथी शिक्षकांची वेळेवर नियुक्ती होत नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गोल्याळी सरकारी शाळेत 2 मराठी शिक्षक, 1 कन्नड शिक्षक व 1 क्रीडा शिक्षकाची गरज आहे. या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने येथील शालेय विद्यार्थ्यांनी व पालकांनी वारंवार संबंधितांसमोर आपल्या समस्या मांडूनही काही फरक पडला नाही. त्यामुळे आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून पालकांनी थेट तालुक्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना गाठून त्यांच्यासमोर समस्या मांडल्या व निवेदन दिले.

श्रीसाईनाथ स्व-सहाय्य संघाच्या महिला कार्यकर्त्या, गोल्याळी गावातील विद्यार्थ्यांचे पालक व गोल्याळी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष रामलिंग गवस यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी खानापूर तालुक्याचाय गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्याचप्रमाणे गावच्या महिलांनी प्रथमच घराबाहेर पडून स्व-सहाय्य संघाच्या माध्यमातून प्रेरीत होऊन आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी खानापूरच्या आमदार, तहसिलदार, सीआरपी, गोल्याळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शाळा सुधारणा कमिटी यांनाही निवेदने दिली आहेत. तसेच ग्राम पंचायतीचे पीडिओ यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी ‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून ग्रामीण शिक्षण अभियानअंतर्गत दुर्गम भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिन असे राहुल पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुजाता गुरव, सरस्वती चौगुले, संजना गुरव, पुनम चौगुले, अश्वीनी गुरव, सुवर्णा सावंत, साधना गुरव, लीला दळवी, रुपाली गुरव, सत्यभामा चौगुले, दर्शना गुरव, आरती चौगुले व कविता गुरव या सदस्या उपस्थित होत्या.


Recent Comments