सृष्टिकर्ता, परमात्मा, शिव अशा विविध नावानी ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकर अर्थात हर महेश नवमी बेळगावात आज उत्साहात, भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

होय, शुक्ल पक्षातील नवमी म्हणजे ८ जून रोजी बुधवारी ज्येष्ठ मासात साजरी करण्यात आली. भगवान शिव आणि पार्वतीला समर्पित ही नवमी अपार आनंद, संपत्ती, अखंड सौभाग्य प्राप्त करून देते अशी श्रद्धा आहे. या पार्श्वभूमीवर शहापूरातील माहेश्वरी भवनात माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी साजरी करण्यात आली. या निमित्त बालाजी मंदिरात भगवान शिवांचा विशेष अभिषेक, पूजा करण्यात आली. महेश नवमीनिमित्त माहेश्वरी समाजातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील अनेक युवकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केले.

या संदर्भात ‘आपली मराठी’ला अधिक माहिती देताना माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष विजय राठी म्हणाले, दरवर्षी महेश नवमीनिमित्त आमच्या समाजातर्फे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे यंदा केएलई हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. त्यात समाजाच्या अनेक युवकांनी सहभागी होऊन रक्तदान केले आहे असे सांगितले.
यानंतर भगवान महेशाच्या भव्य मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. जोशी गल्ली, शहापूर येथील माहेश्वरी समाजाच्या बालाजी मंदिरापासून सुरु झालेली ही मिरवणूक शिवाजी उद्यान व शहापूर परिसरात फिरून बालाजी मंदिरासमोर विसर्जित करण्यात आली. माहेश्वरी समाजाचे स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष अशोक चिंडक, सचिव पुरुषोत्तम भट्टड, खजिनदार विजय जाजू, रमेश मुंदडा, शिरीष मालू, श्रीप्रकाश महेश्वरी, गिरीधारीलाल यांच्यासह इतरांनी परीश्रम घेतले.


Recent Comments