डॉ. एफ व्ही मानवी यांनी आपली ७५ वर्षे हि सर्वांसाठी खर्च केली आहेत. डॉ. मानवी हे अत्यंतर सरळ, सज्जन व्यक्ती असल्याचे मत गदग डंबळचे डॉ. तोंटद सिद्धाराम महास्वामी यांनी व्यक्त केले.
बेळगावमधील डॉ. एफ व्ही मानवी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रम नागनूर रुद्राक्षी मठाच्या एस जी बाळेकुंद्री इंजिनियरिंग महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास डॉ. तोंटद सिद्धाराम स्वामींचे दिव्य सानिध्य लाभले होते.
यावेळी बोलताना तोंटद सिद्धाराम स्वामींनी डॉ. एफ व्ही मानवी यांचे कौतुक केले. वयाची ७५ वर्षे हि प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वपूर्ण असतात. डॉ. एफ व्ही मानवी यांनी सातत्याने सर्वांशी आत्मीयतेने नाते निर्माण केले. प्रत्येकाशी प्रेमाने आणि नम्रपणे नाते जोडले. याबद्दल स्वामीजींनी त्यांचे कौतुक केले. यावेळी संत बसवेश्वर महाराजांसंदर्भात देखील उदाहरण देत त्यांच्या तत्वानुसार प्रत्येकाने जीवन जगले पाहिजे, असे सांगितले.
यानंतर डॉ. एच बी राजशेखराप्पा बोलताना म्हणाले, डॉ. मानवी यांच्यासोबत गेल्या ५० वर्षांपासून आपले नाते आहे. त्यांचा फार्मसी विभाग आणि आपला औषधी विभाग असूनही आपले जवळचे नाते निर्माण झाले. १९८०, १९९०, २०१० या दरम्यान राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर फार्मसी विभागासाठी डॉ. मानवी यांनी उत्तम काम केले. याचदरम्यान त्यांची ओळख निर्माण झाली, के एल इ संस्थेसाठी आम्ही दोघांनीही काम केले असल्याचे ते म्हणाले.

ज्येष्ठ साहित्यिक प्रो. बी एस गविमठ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नांगनूर रुद्राक्षी मठ आणि के एल इ एस संस्थेने बेळगावसाठीमहत्वपूर्ण योगदान दिले आहे. कन्नडची मुळे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. डॉ. शिवबासाव महास्वामींच्या दूरदृष्टिकोनातून बेळगावमध्ये इतके मोठे महाविद्यालय कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार महांतेश कौजलगी यांनीहि डॉ. एफ व्ही मानवी यांचे कौतुक केले. के एल इ संस्था आणि रुद्राक्षी मठासाठी तसेच समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले.
यावेळी स्वामींच्या हस्ते डॉ. एफ. व्ही मानवी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी, कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी, डॉ. बसवराज जगजंपी, डॉ. गुरुदेवी हुलेप्पनवरमठ, डॉ. सुप्रिया आणि डॉ. विरेश मानवी, विश्वनाथ मानवी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments