Belagavi

Will make necessary changes in the textbook : पाठयपुस्तकात आवश्यक बदल करणार : मुख्यमंत्री

Share

पाठयपुस्तकात बसवण्णा यांच्याबाबतच्या मजकुरात समग्र बदल करून बसवण्णांच्या खऱ्या स्वरूपाची आणि वचन साहित्याची सर्वांना ओळख करून द्यावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. यासंदर्भात आम्ही सर्वांशी संपर्क साधून आवश्यक ती पावले उचलू असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

चित्रदुर्गातील हिरीयुर तालुक्यातील देवरकुट्ट गावात नवीन पुस्तक समिती स्थापन केली जाणार आहे का, याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, त्याचा प्रश्नच येत नाही. समितीने आपले काम लवकर संपवल्याने ती विसर्जित केली आहे. रद्द केलेली नाही. पाठयपुस्तकात कसा, कोणता बदल करणार यावर बोम्मई म्हणाले, विविध स्वामीजींनी पत्र लिहून सूचना केल्या आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. आमचे सरकार बसवण्णा यांच्या विचारधारेनेच चालणारे सरकार आहे असे त्यांनी सांगितले.

बसवण्णा यांच्यासारखी उत्कृष्ट वचने अन्य कोणी लिहिली नाहीत. २०१५मध्ये काँग्रेसने नेमलेल्या बरगुर रामचंद्रप्पा पाठयपुस्तक समितीने केलेल्या आणि आताच्या समितीने केलेल्या पाठयपुस्तकातील बदलत केवळ एका वाक्याचा फरक आहे. बाकीचा अभ्यासक्रम तोच आहे. बसवण्णा यांच्या लिंगदीक्षेबाबतच्या मजकुरावर सानहळ्ळी स्वामीजींनी आक्षेप घेतला आहे. तो मजकूर बरगुर रामचंद्रप्पा यांच्या समितीने ठरविलेल्या पाठयपुस्तकातही होता असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

संघाचे संस्थापक हेडगेवार यांचे भाषण पाठयपुस्तकातून वगळणार नसल्याचे स्पष्ट करून, त्या भाषणात आक्षेपार्ह काहीच नाही. त्यामुळे ते वगळण्याचा प्रश्नच नाही असे बोम्मई म्हणाले. मंदिर-मशीद वादावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

एकंदर, पाठयपुस्तकातील चुका दुरुस्त करणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले आहे. ही सुधारणा कशा पद्धतीने केली जाते हे पहावे लागेल.

 

 

 

Tags: