Belagavi

Demand for space for Lingayat Cemetery in Kadoli : कडोलीत लिंगायत स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली येथील लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन समाजबांधवांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

स्वतंत्र स्मशानभूमीअभावी कडोलीतील लिंगायत समाजाच्या नागरिकांना अडचण होत आहे. त्यामुळे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लिंगायत समाजबांधवांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. स्मशानभूमीअभावी सध्या खासगी जमिनीतच अंत्यविधी करावे लागत आहेत.

मात्र त्या जमिनीच्या मालकाने आता प्लॉट पाडून विक्री सुरु केली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या १० वर्षांपासून स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करत आहेत, परंतु अद्याप जागा देण्यात आलेली नाही. ग्राम पंचायतीच्या गायरान जागेतील जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की, कडोली येथे लिंगायत समाजाची सुमारे २ हजार लोकसंख्या आहे. आता आमच्यावर शेतातच दफनविधी करण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करत आहोत. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या जागेतील २ एकर जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मल्लिकार्जुन तिगडी, सुनील पाटील, सुधीर तिगडी, सुरेश गुडीमनी, प्रकाश गुडीमनी, अशोक गुडीमनी, ईश्वर पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: