रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समिती बरखास्त केलेली नाही. त्या समितीची मुदत संपल्याने ती विसर्जित करण्यात आली आहे. पाठयपुस्तकात काही त्रुटी असतील तर आमचे सरकार त्या दूर करेल असे उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वत्थनारायण यांनी सांगितले.

बेळगावात शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, साहित्यिकांच्या दबावापुढे झुकून सरकारने पाठयपुस्तक समिती बरखास्त केली का? या प्रश्नाला उत्तर देताना उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वत्थनारायण यांनी हे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. समितीची मुदत संपली आहे. तिने अहवाल सादर केला आहे. त्यामुळे समिती बरखास्त केलेली नाही. ती विसर्जित केली आहे. पाठ्यपुस्तकातील मजकुरामुळे कोणाच्या भावना दुखावत असतील तर कोणाच्या काही सल्ला, सूचना लक्षात घेऊन तसा आक्षेपार्ह मजकूर वगळण्यात येईल. सरकार जनतेच्या बाजूने असले पाहिजे. जनतेला विश्वासात घेऊन योग्य ती उपाययोजना करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित चक्रवर्ती यांच्यामुळे हा सगळं गोंधळ निर्माण झाला का या प्रश्नावर, आता छापलेल्या पाठयपुस्तकात काही त्रुटी, चुका असतील तर त्या दुरुस्त करू, आक्षेपार्ह मजकूर वगळण्यासाठी योग्य उपाय करू. येथे एका व्यक्तीचा प्रश्न नाही. समितीत ४-५ लोक असतात. सगळ्यांच्या विचाराने निर्णय होतात. काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी खात्यातर्फे सर्व दक्षता घेऊन उपाययोजना करू असे मंत्री अश्वत्थनारायण यांनी सांगितले.
पाठ्यपुस्तक सुधारणा समितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे लोक आहेत या काँग्रेस नेत्यांच्या आरोपावर मंत्री अश्वत्थनारायण म्हणाले, आम्ही सगळेच मूळचे संघाचेच आहोत. येथे बसलेले सर्व लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत, आणखी कुठले असतील? आम्ही सगळ्यांना एकत्र करून देश आणि समाज घडवण्याच्या प्रक्रियेत आहोत. समाज आणि देश मजबूत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत असे ते म्हणाले. बाईट
प्रत्येकजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत का, असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी केला असता अश्वत्थनारायण म्हणाले, आरएसएसचे मार्गदर्शन असे नाही, आम्ही मूळचे आरएसएसचे आहोत आणि संघटनेत आहोत. सरकारमध्ये काम करताना जनतेचे मत विचारात घेऊन देश घडविण्याचे काम करत आहोत. आरएसएस ही स्वयंसेवी संघटना आहे. या संघटनेत सर्व धर्म आणि जातीच्या लोकांचा समावेश आहे. समाज देशाला पूरक असे काम करते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
काँग्रेसचे नेते भाजप सोडून आरएसएसला टार्गेट करत आहेत का, असा सवाल माध्यमांनी केला. त्यावर, बातम्यांमध्ये राहण्यासाठी ते असे करतात. त्यांनी विचारपूर्वक बोलले पाहिजे. वैयक्तिक गोष्टीत जाण्यापेक्षा काय चूक आणि काय चूक याच्या भूमिकेत स्पष्टता हवी. कोणत्या कामात काय चूक, दोष आहे? ते दाखवून दिले पाहिजे. मानहानी करणे, अवमानकारक बोलणे, वाईट विधाने करणे यापासून दूर राहिले पाहिजे. अशा विधानांचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय केले?, कसे वागले? सत्तेत राहून जनतेसाठी काम करण्याऐवजी त्यांनी स्वतःची भरभराट करून घेतली. त्यामुळेच लोकांनी त्यांना नाकारले अशी टीका त्यांनी केली.
एकंदर उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वत्थनारायण यांनी बेळगावात अनेक मुद्द्यांवर अशा प्रतिक्रिया दिल्या.


Recent Comments