खानापूर रोड ते शौर्य चौक, कॅम्प मार्गे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. या समस्येमुळे विद्यार्थी आणि पालकवर्गात भीती निर्माण झाली आहे.
खानापूर रोड ते शौर्य चौक, कॅम्प या मार्गाने मार्गस्थ होणाऱ्या अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरात अनेक शाळा असल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळा भरण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर मोठी समस्या अवजड वाहनांमुळे निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात या मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ता पार करणे हे विद्यार्थ्यांसाठी जिकिरीचे ठरत आहे.
कॅम्प परिसरात सेंट जोसेफ, सेंट पॉल, सेंट झेव्हियर्स तसेच अनेक शाळा आहेत. या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी येतात. परंतु या विद्यार्थ्यांना आता येथील अवजड वाहनांमुळे धोका निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ या भागात असल्याने अनेकवेळा पालकांच्या संघाने रहदारी पोलीस विभागाला निवेदने देखील दिली आहेत. परंतु या निवेदनावर पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने पालकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
यासंदर्भात आपली मराठीशी बोलताना सुनील जाधव म्हणाले, या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी अनेक विद्यार्थी या परिसरातून मार्गस्थ होतात. मात्र या परिसरातून मार्गस्थ होताना विद्यार्थ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. हि समस्या तातडीने रहदारी विभागाने सोडवावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
या परिसरात होत असलेली वाहनांची गर्दी, विद्यार्थ्यांची उडणारी तारांबळ पाहता या भागात रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात होणारी विद्यार्थ्यांची वर्दळ आणि याचदरम्यान वाहनांची गर्दी, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रहदारी विभागाने गांभीर्याने या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे.


Recent Comments