क्केरी तालुक्यातील दड्डी ग्रामपंचायतीला नरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कुली कर्मचाऱ्यांनी घेराव घालून धरणे आंदोलन छेडले.

गेल्या २ वर्षांपासून नरेगा योजने अंतर्गत काम करणाऱ्या बाळाप्पा पाटील या कुली कर्मचाऱ्याला पगार देण्यात आला नाही. यासंदर्भात अनेकवेळा ग्रामपंचायत अधिकारी तसेच संगणक ऑपरेटर संतोष यांना कळविण्यात आले आहे. अनेकवेळा ग्रामपंचायतीची वारी करूनही कारणे देण्यात येत आहेत. केव्हाही पगाराची मागणी करण्यात आल्यास उद्या पगार देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप पगार देण्यात आला नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली.
अनेक कुली कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक बदलले असून इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा करण्यात येत आहे. मात्र बँक खात्यासंदर्भात अनेक वेळा सूचना करूनही खाते क्रमांक बदलण्यात येत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. एनएमआर अंतर्गत काही कामगारांची नावेही दिसत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. ११.३० च्या दरम्यान येणारे अधिकारी अद्यापही ग्रामपंचायतीत पोहोचले नाहीत. दररोज अशीच कारणे देण्यात येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी संगणक ऑपरेटर आणि कामगारांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली. कुली कामगारांनी शांतता राखावी असे आवाहन केल्यानंतर एनएमआर मध्ये कामगारांचे नाव समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
गेल्या २ वर्षांपासून कुली कामगारांची हि समस्या जैसे थे स्थितीत आहे. अनेकवेळा ग्रामपंचायतीच्या दारी येऊनही पदरी निराशाच पडत असल्याने आज हुक्केरी येथील कुली कामगारांनी कुदळ आणि बुट्टी घेऊन ग्रामपंचायतीला घेराव घातला. या ग्रामपंचायतीतील अध्यक्ष आणि सदस्य हे केवळ नावापुरतेच आहेत का? असा संतप्त सवाल देखील यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.
यावेळी कस्तुरी यल्लाप्पा गस्ती, रुक्मिणी भीमाप्पा मेटगुड्डी, शिल्पा पुंडलिक गस्ती, शिवाप्पा बाळाप्पा जीड्राळे, कविता मुन्नाप्पा मरकोटे, शांतव्वा सिद्दप्पा कुबर्गी, यल्लाप्पा लक्ष्मण गस्ती, बसवंत सिद्दप्पा कोले, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.


Recent Comments