Vijayapura

Welcome back to school: विजापुरातील शाळा पुन्हा गजबजल्या

Share

शालेय वर्ष सुरु होण्याचा १ जून हा नेहमीच दिवस. उन्हाळी सुट्ट्यांनंतर १ जूनपासून दरवर्षी शाळांना सुरुवात होते. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे हे गणित काहीसे बिघडले आहे. २ वर्षानंतर पुन्हा पूर्ण उत्साहात शाळा सुरु करण्यात आल्या असून १६ मे पासूनच यंदा शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु दरवर्षीप्रमाणे १ जून पासून अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला येणे पसंत केले आहे. विजापूरमध्ये आज अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.

उन्हाळी सुट्टीनंतर आज विजापूरमधील शाळा पुन्हा एकदा गजबजलेल्या पाहायला मिळाल्या. विजापूर शहरातील अनेक शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यंदा सरकार आणि शिक्षण विभागाने १६ मे पासूनच शाळा सुरु करण्याचा आदेश दिला होता. मात्र दरवर्षी १ जून पासून शाळा सुरु होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी १६ मे पासून शाळेत उपस्थिती दर्शविली नाही. मात्र आज शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. विजापूरमधील प्रसिद्ध रवींद्रनाथ टागोर शाळेत फुगे लावून, रांगोळी रेखाटून, आकर्षक सजावट करून उत्तम वातावरण निर्माण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शिवाजी गायकवाड आणि शाळेच्या मुख्याध्यापिका फारिन खान यांनी शाळेचा परिसर कागदी फुलांनी सजविला होता. सरस्वती पूजनाने अनेक शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.

नर्सरी, युकेजी साठी प्रवेश घेतलेल्या बालविद्यार्थ्यांना हे नवे वर्ष आणि एक नवा अनुभव असल्याने आपल्या अंगावर नवा गणवेश परिधान करून आनंदी वातावरणात हे विद्यार्थी शाळेत दाखल झालेले पाहायला मिळाले. पालकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात आज शालेय परिसरात दिसून आली. अनेक शाळांमध्ये पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिठाई वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

राज्यभरातील शाळा आज पुन्हा पूर्ववत सुरु झाल्या असून विजापूरमधील शालेय परिसर देखील गजबजलेले आज पाहायला मिळाले. नर्सरी आणि एळॆजी – युकेजी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचीही गर्दी शाळा परिसरात दिसून आली. नवा गणवेश, नवी पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर यासह शालोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची तारांबळ उडाली असून एकंदरीत गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले शाळेचे दरवाजे आज उत्स्फूर्त वातावरणात विद्यार्थ्यांसाठी सुरु झाले आहेत.

Tags: