न्याय देवता मानल्या गेलेल्या शनिदेवांचा जन्म ज्येष्ठ अमावस्येला झाला. त्यामुळे या दिवशी सर्वत्र शनीची पूजा केली जाते. शनिदेवाच्या उपासनेने सर्व संकटे, त्रास, दोष दूर होतात अशी श्रद्धा आहे. बेळगावातही आज ज्येष्ठ मास अमावास्येनिमित्त श्री शनी जयंती श्रद्धा, भक्तीने साजरी करण्यात आली.

होय, ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला श्री शनैश्चर जयंती साजरी करण्यात येते. यावर्षी ही अमावस्या आज ३० मे रोजी बरोबर सोमवारी आल्याने संपूर्ण देशात उत्साहाने, भक्तिभावाने शनिदेवांची जयंती साजरी करण्यात आली. बेळगावातील पाटील गल्लीतील शनी मंदिरातही आज शनिदेवाची विशेष पूजाअर्चा करण्यात आली. सकाळी सहा वाजता जन्मोत्सव, तैलाभिषेक, अभिषेक, आरती यासह विविध धार्मिक विधी यानिमित्त पार पडले. बेळगाव आणि परिसरातील शेकडो भाविकांनी या मंदिरात हजेरी लावून शनिदेवाचे दर्शन घेतले. भक्तांसाठी देवस्थान समितीतर्फे महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. 
यावेळी ‘आपली मराठी’ला माहिती देताना शनी मंदिराचे पुजारी आनंद विश्वनाथ अध्यापक यांनी सांगितले की, शनी जयंतीनिमित्त आज सकाळी ६ वाजता मंदिरात शनी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तैलाभिषेक, अभिषेक, आरती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. भक्तांसाठी महाप्रसादही आयोजित केला होता. शनिदेवाच्या दर्शनाने सर्व दोष दूर होतात. शनी देवांना न्यायाची देवता मानले जाते. माणसाच्या कर्मानुसार फळ ते देतात. त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी शनी जयंतीसारखा दुसरा दिवस नाही. शनी जयंतीला काळे तीळ, मूग, घोंगडे अशा वस्तू दान केल्याने शनिदेवाची कृपा होते असे मानले जाते. शनी जयंतीनिमित्त आज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे आनंद अध्यापक यांनी सांगितले. बाईट शनी मंदिर समितीच्या सदस्यांनी सांगितले की, गेली दोन वर्षे कोरोनामुळे शनी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नव्हती. पण यंदा, शनिदेवाच्या कृपेने कोरोनाचे थैमान संपले आहे. त्यामुळे यंदा भव्य प्रमाणात शनी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केले आहे.
एकंदर शनी जयंतीनिमित्त बेळगावातील प्राचीन ऐतिहासिक शनी मंदिरात सणासारखे वातावरण होते. बेळगाव व परिसरातील शेकडो भक्तांनी उत्साहात, श्रद्धा, भक्तीने मंदिरात येऊन शनिदेवांचे दर्शन घेतले.


Recent Comments