Belagavi

हुतात्मा जवान प्रशांत जाधव यांना बेळगावात आदरांजली

Share

 लडाख येथे श्योक नदीत लष्कराचे वाहन कोसळून झालेल्या भीषण अपघातातील हुतात्मा जवान प्रशांत जाधव यांचे पार्थिव रविवारी विमानाने बेळगावातील सांबरा विमानतळावर आणण्यात आले. या ठिकाणी बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री गोविंद कारजोळ, . अनिल बेनके यांच्यासह मान्यवरांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.

होय, लडाख येथे तुर्तुक भागात २६ जवानांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन शुक्रवारी श्योक नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ७ जवानांचा मृत्यू झाला होता. तर १९ जवान जखमी झाले होते. या अपघातात महाराष्ट्रातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथील जवान प्रशांत जाधव यांचाही मृत्यू झाला होता. हुतात्मा जवान प्रशांत जाधव यांचा मृतदेह विमानाने आज, रविवारी सकाळी बेळगावातील सांबरा विमानतळावर आणण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री गोविंद कारजोळ, आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. 

यानंतर हुतात्मा प्रशांत जाधव यांचे पार्थिव शरीर त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथे रस्तामार्गे नेण्यात आले. यावेळी मराठा लाईट इन्फन्ट्रीचे तसेच महसूल खात्याचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रशांत जाधव यांनी २०१४ मध्ये बेळगावातील मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये देशसेवेत दाखल झाले होते. जानेवारी २०२० मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना ११ महिन्यांची मुलगी आहे. दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी मुलगी नियती आणि पत्नी पद्मासह गुजरातमधील बाम शहरात वास्तव्य केले होते. त्यांचे वडील सेवानिवृत्त जवान शिवाजी जाधव, आई रेणुका मूळ गाव बसर्गे येथे राहतात. प्रशांत जाधव यांना वीरमरण आल्याने गावकऱ्यांना अभिमान तर आहेच, पण उमद्या जवानाचा अकाली मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. आज दुपारी तमाम शासकीय इतमामात बसर्गे बुद्रुक येथे हुतात्मा प्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Tags: