Belagavi

पुरावे पुसण्याचा प्रयत्न पाहता ती मशीद मंदिर हे सिद्ध : आ. अभय पाटील

Share

बेळगावातील रामदेव गल्लीतील मशिदीमधील गाभाऱ्याचा दरवाजा, खांब, आतील चित्रे पुसून टाकण्याचे प्रयत्न पहिले तर ही मशीद आधी मंदिरच होते हे सिद्ध होते. त्याच्या शेजारीच हनुमान मंदिर आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तेथे प्रत्यक्ष पाहणी करून सत्य काय ते बाहेर आणावे अशी मागणी . अभय पाटील यांनी केली

बेळगावात रविवारी पत्रकारांशी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, उद्या मी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून माझ्या निदर्शनास आलेला विषय त्यांना सांगणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः तेथे जाऊन पाहणी करून सत्य काय आहे ते जनतेला सांगावे. ही वस्तू मंदिर होती हे पाहताक्षणीच निदर्शनास येते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आ. अभय पाटील यांनी केली.

आठवड्यापूर्वी लोकांनी माझ्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. मात्र मी लगेचच प्रतिक्रिया दिली नाही. स्वतः बाहेरून पाहणी करून खात्री करून घेतली. बाहेरून पाहिले असता हे मंदीर आहे हे सिद्ध होते. म्हणून मी प्रतिक्रिया दिली आहे. बेळगावात आणखी २-३ ठिकाणी अशा वस्तू आहेत असे मला लोकांनी फोन करून सांगितले आहे. अन्य विविध गावातही अशाचप्रकारच्या वस्तू आहेत असे किमान १५ फोन मला आले आहेत. मात्र लगेच तसा दावा करता येत नाही. त्याचे सत्य बाहेर आले पाहिजे. जिथून फोन आले आहेत, त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे असे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

रामदेव गल्लीतील मशीद महादेव मंदिर होते असे काहींचे म्हणणे आहे तर काहींच्या मते ते राम मंदिर होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मनात आणले तर त्यांचा खरा इतिहास बाहेर येईल. पुरातत्व खात्याकडेही या मंदिरांबाबत कागदपत्रे असतील. ती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आधी जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल देऊ देत असे आ. पाटील म्हणाले.

एकंदर आ. अभय पाटील यांनी बेळगावातील रामदेव गल्लीतील मंदिरासह अन्य काही मंदिरांचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. या प्रकरणी आता प्रशासन काय निर्णय घेणार हे पहावे लागेल.

 

Tags: