बेळगाव शहरात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त वायव्य कर्नाटक परिवहन संस्थेच्या कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
वायव्य कर्नाटक परिवहन संस्था बेळगाव विभाग, बेळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने वायव्य कर्नाटक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनजागृतीपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. मध्यवर्ती शहर बसस्थानकात या कार्यक्रमाचे आयोजन विभागीय नियंत्रणाधिकारी पी वाय नामक, न्यायाधीश, कायदा सेवा प्राधिकारचे मुरुळी मोहन रेड्डी, जिल्हा वैद्याधिकारी एस पी मुन्याळ, जिल्हा सर्वेक्षणाधिकारी डॉ. बी एन तुक्कार, तालुका आरोग्याधिकारी शिवानंद मास्तिहोळी, डॉ. श्वेता पाटील, आदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. 
यावेळी या कार्यक्रमाला उद्देशून बोलताना न्यायाधीश आणि कायदा सेवा प्राधिकरणाचे सेक्रेटरी जज मुरुळी मोहन रेड्डी म्हणाले, चालक आणि रस्ते हि आर्थिक सुव्यवस्थेची जीवनदायिनी आहे. ज्या ज्या ठिकाणी उत्तम रस्ते आहेत त्या त्या ठिकाणी उद्योग विकसित झालेले पाहावयास मिळतात. याचप्रमाणे देशाच्या जेडीपीत चालकांचे मोठे योगदान आहे. यामुळे सर्व चालकांनी व्यसनापासून दूर राहावे, अशी विनंती त्यांनी केली.
डॉ. तुक्कार यांनी तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पन्नामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली. रात्रीच्या वेळी वाहन चालविताना झोप लागू नये यासाठी अनेक चालक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. परंतु अशा पद्धतीचे व्यसन करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास विविध वैद्याधिकारी, कर्मचारी, विविध एनजीओ सदस्य, एनसीसी विद्यार्थी, वायव्य कर्नाटक परिवहन कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments