Chikkodi

एसीबी अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक; दोघा सराईत भामट्याना एसीबीकडून बेड्या

Share

एसीबी अधिकारी असल्याचे भासवून सरकारी अधिकाऱ्यांना छापेमारी आणि कारवाईच्या भीतीने ब्लॅकमेल करणाऱ्या दोघा अट्टल भामट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

होय, संपूर्ण कर्नाटकात सरकारी अधिकाऱ्यांना एसीबी अधिकारी असल्याचे भासवून, छापे टाकून कारवाई करायची धमकी देऊन ती टाळायची असल्यास अमुक खात्यात इतके पैसे भर असे सांगून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे दोघेही सराईत भामटे असून अशा प्रकरणात त्यांना याआधीही अटक झालेली होती. जामिनावर असताना त्यांनी पुन्हा आपल्या काळ्या कारवाया सुरु केल्याने पुन्हा त्यांना गजाआड करण्यात आले आहे.

या प्रकरणी मूळचा चिक्कोडी तालुक्यातील सदलगा गावचा मुरिगेप्पा निंगाप्पा कुंबार, वय 56 आणि हासन जिल्ह्यातील सकलेशपूर तालुक्यातील मुगुली गावातील रजनीकांत नागराज, वय 46 या दोघांना 27-05-2022 रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून काही सिमकार्डस आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

यातील पहिला आरोपी मुरिगेप्पा निंगाप्पा कुंबार याच्यावर अशा प्रकारचे 40 तर रजनीकांत नागराज याच्यावर  6 गुन्हे याआधीच दाखल करण्यात आले आहेत. यातील काही प्रकरणे तपासाधीन आहेत. तर काही प्रकरणे न्यायालयाच्या विचाराधीन आहेत. काही प्रकरणात न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंटही जारी केले आहे. काही प्रकरणात अटक झाल्यानंतर न्यायालयाकडून जमीन मिळवून सुटल्यावर हे दोघेही फरार झाले होते. या दोघांना अटक करण्यासाठी बागलकोटचे एसपी लोकेश, हासनचे एसपी आर. श्रीनिवास गौड व सहकाऱ्यांच्या मदतीने बेळगाव उत्तर विभागाचे एसीबी एसपी बी. एस. नेमगौडा आणि म्हैसूर दक्षिण विभागाचे एसपी सतेज व्ही. जे. व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

आरोपींनी एसीबी असल्याचे सांगत सरकारी अधिकाऱ्यांना फोन करून छापे टाकून कारवाईची धमकी देऊन कारवाई टाळण्यासाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगून अनेक अधिकाऱ्यांना लुटले आहे. यासाठी त्यांनी ठिकठिकाणांहून वेगवेगळ्या नावांनी सिम कार्ड्स आणि मोबाईल खरेदी केले होते असे तपासात आढळले आहे . त्यांची अधिक चौकशी सुरु आहे. एसीबी कारवाईच्या नावाने त्यांनी अनेक सरकारी अधिकाऱ्यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. एखाद्या सरकारी कर्मचारी वा अधिकाऱ्याला अशाप्रकारचे फोन आल्यास त्यांनी नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

 

 

Tags: